25.9 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रएसटीच्या बसेस इलेक्शन मोडवर

एसटीच्या बसेस इलेक्शन मोडवर

मुंबई : राज्यात एकाच टप्प्यात होणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगही सज्ज आहे. मतदानाचे यंत्र, साहित्य आणि मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याची आणि तिथून मतमोजणीसाठी नेण्याची जबाबदारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतशी राजकीय प्रचार सभांची तोफ जोमाने धडाडतेय. आपले आमदार निवडून देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर अशा २ दिवसांसाठी एसटीकडे तब्बल ९ हजार बसची मागणी केली. त्यापैकी १९ नोव्हेंबरला मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी ८ हजार ९७८ बस वापरल्या जाणार आहेत आणि २० नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर यंत्र मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यासाठी तेवढ्याच गाड्या वापरात असतील. तसेच २४५ बस पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. प्रत्येक सजग भारतीय नागरिकाने देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपले बहुमूल्य मत द्यायलाच हवे. अर्थात २० नोव्हेंबरला राज्यात मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतील. अशात हजारोंच्या संख्येने बस निवडणूक प्रक्रियेसाठी धावणार असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अर्थात नागरिकांच्या सोयीसाठी एसटीने गाड्यांचे योग्य ते नियोजन केले असेलच. परंतु तरीही नागरिकांनी गाड्यांची संख्या आणि वेळ पाहून प्रवास करणे जास्त सोयीचे ठरेल. जेणेकरून वेळेत मतदान होईल आणि आपले पुढचे वेळापत्रकही कोलमडणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, १ हजार खासगी स्कूल बस आणि ४०० बेस्ट बसदेखील निवडणूक प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहेत.
दरम्यान, एसटीच्या ताफ्यात सध्या स्वमालकीच्या १३ हजार ३६७ बस आहेत. त्यातील ९ हजार २३२ गाड्या राज्यातील ३१ विभागांना निवडणुकीच्या कामकाजासाठी देण्यात येणार आहेत.

एसटीला होणार आर्थिक फायदा
लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठीही एसटी बस धावल्या होत्या. त्यावेळी मार्ग आणि किलोमीटरप्रमाणे भाडे ठरविण्यात आले. त्यातून एसटीला एका बससाठी जवळपास २४ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळाले. आता विधानसभा निवडणुकीतही याचप्रमाणे भाडेआकारणी होणार आहे, त्यामुळे एसटीला तसाच फायदा होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR