मुंबई/नागपूर : राज्यातील आगामी निवडणुकांच्या तोंडावर मतदार याद्यांमधील संभाव्य घोळावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील तब्बल २ कोटी ६६ लाख मतदारांच्या नोंदींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राज्यातील निवडणूक आयोग सत्ताधा-यांचा गुलाम बनल्याचा वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे.
मतदारांबाबत निवडणूक आयोगाने पारदर्शक आणि सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनर्निरीक्षणनुसार स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदी असलेले मिळून जवळपास २ कोटी ६६ लाख ८८ हजार ४७८ मतदारांवर प्रश्न निर्माण झाला आहे. याचाच अर्थ राज्यातील तब्बल २१.४१ टक्के मतदार अंतिम यादीतून वगळले जाण्याची दाट शक्यता आहे.
या आकडेवारीचे सविस्तर विश्लेषण करताना त्यांनी सांगितले की यापैकी ७६ लाख ७६ हजार १३५ मतदार स्थलांतरित आणि ७५ लाख ४१ हजार ५२० मतदार गैरहजर म्हणून दाखवण्यात आले आहेत. विसंगतीच्या नावाखाली ६२ लाख ४८ हजार २८१ मतदार दाखवले आहेत. हा सगळा एकत्रित आकडा दोन कोटींच्या पुढे जातो, जो अत्यंत संशयास्पद आहे.अरे लाज तरी ठेवा, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक पदावर बसून तुम्ही सत्ताधा-यांचे गुलाम झाल्यासारखे वागताय. अशा प्रकारची भाषा वापरणे आयोगाला शोभते का?, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. काही विशिष्ट मतदारसंघांत २१ टक्के आणि मुस्लिम बहुल क्षेत्रात २९ टक्के मतदान कमी झाल्याचे दाखवून आयोग कोणाच्या इशा-यावर काम करत आहे, असा सवालही त्यांनी विचारला. या नव्या आकडेवारी आणि आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
अल्पसंख्याक, एससी-एसटींना केले लक्ष्य
वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. ते म्हणाले राज्यातील ३८ अल्पसंख्याक किंवा मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार वगळले गेले आहेत. हा आकडा तब्बल २९.७७ टक्के इतका मोठा आहे.
निवडणूक आयोगाच्या भाषेवर तीव्र आक्षेप
निवडणूक आयोगाने नुकत्याच केलेल्या एका दाव्याचा आणि सोशल मीडियावरील पोस्टचा वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. आयोगाने इतर मतदारसंघांतही मतदान कमी झाल्याचे सांख्यिकीय विश्लेषण दिले होते. मात्र, सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये आयोगाने सो-कॉल्ड मुस्लिम डॉमिनेटेड विधानसभा मतदारसंघ असा शब्दप्रयोग केल्याने वडेट्टीवार संतप्त झाले.
वडेट्टीवारांकडे पुरावे असतील : नाना पटोले
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टेंडर आरोपांवर बोलताना, त्यांच्याकडे नक्कीच काही माहिती असेल, त्या आधारावरच त्यांनी ते वक्तव्य केले असेल, असे स्पष्ट केले. तर ममता बॅनर्जींच्या चिन्हाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोलताना, निवडणूक आयोग कोणाच्या इशा-यावर चालतो हे सर्वांनाच माहीत असल्याचे त्यांनी सुनावले.
















