मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जुहू येथील निवासस्थानी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एक देखणा, दिलदार आणि बिनधास्त कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. धर्मेंद्र यांचे निधन झाल्यावर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व हरविले : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहितात धर्मेंद्र जी यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व होते, एक अलौकिक अभिनेते आणि त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत ते खोल शिरायचे. विविध प्रकारच्या भूमिका ते ज्या सहजतेने आणि खास पद्धतीने साकारायचे, त्यामुळे त्यांनी कोट्यवधी लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. धर्मेंद्रजी त्यांचा साधेपणा, नम्रता आणि प्रेमळ स्वभावासाठीही तेवढेच लोकप्रिय होते. या दु:खद क्षणी, माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत, मित्रांसोबत आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांसोबत आहेत.
मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली : शरद पवार
शरद पवार लिहितात की १९६० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणा-या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मने जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणा-या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची, त्यांच्या केशभूषेची, वेशभूषेची चाहती होती.
योगदान नेहमीच स्मरणात : राजनाथ सिंह
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोस्ट करुन लिहिले आहे की हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार धर्मेंद्र जी यांच्या निधनाने खूप दु:ख होत आहे. त्यांनी त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्वाने आणि प्रामाणिकपणाच्या बळावर अनेक अविस्मरणीय व्यक्तिरेखांना जिवंत केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे उल्लेखनीय योगदान नेहमीच स्मरणात राहील. या दु:खाच्या प्रसंगी मी त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मन:पूर्वक संवेदना व्यक्त करतो.
चित्रपटसृष्टीचे न भरणारे नुकसान : अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लिहितात, आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सहा दशकांहून अधिक काळ प्रत्येक देशवासीयाच्या हृदयाला स्पर्श करणारे धर्मेंद्र जी यांचे निधन, भारतीय चित्रपटसृष्टीचे न भरून येणारे नुकसान आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली. धर्मेंद्र जी हे त्या मोजक्या कलाकारांपैकी एक होते, ज्यांनी ज्या भूमिकेला स्पर्श केला, ती सजीव झाली आणि याच कलेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक वयोगटातील कोट्यवधी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या अभिनयातून ते सदैव आपल्यामध्ये जिवंत राहतील. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. ॐ शांती शांती शांती.
लखलखता तारा निखळला : देवेन्द्र फडणवीस
भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वप्नाळू, युवा नायक ते तडफदार-बलंदड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलिवुडचा ही-मॅन म्हणून लौकीक मिळवेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी भावुक पोस्ट लिहिली. ते लिहितात, ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचे निधन झाले. भारतीय सिनेमात ‘सुपरस्टार’ म्हणले की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचे बिरुद त्यांना चिकटले नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिले नाही. मला चिकटू दिले नाही असेच जास्त वाटते, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचे प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असे होते.
ही-मॅन हरपला : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिहितात बॉलिवूडचा ही-मॅन हरपला..! बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले. आपल्या साठ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या अदाकारीने माझ्यासारख्या अगणित चाहत्यांना निखळ आनंद देण्याचे काम केले. शोले, चुपके चुपके, सीता और गीता, ड्रीम गर्ल, दी बर्निंग ट्रेन, मेरा नाम जोकर, अपने, लाईफ इन अ मेट्रो, यांसारख्या असंख्य सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमिट छाप रसिकांच्या मनावर उमटवली. बॉलिवूड हिरोच्या प्रतिमेला धर्मेंद्र यांनी नवीन आयाम मिळवून दिला.. मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवणा-या या अभिनेत्याने राजकीय आखाड्यात देखील आपले नशीब आजमावले.
एका तेजस्वी पर्वाचा अंत : अजित पवार
अजित पवार यांनी पोस्ट करुन लिहिले की हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘दिललगी’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषत: ‘शोले’मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे.
सुवर्णयुग हरपले : वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धर्मेंद्र यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीतील एक सुवर्णयुग हरपल्याची भावना व्यक्त केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपट क्षेत्रातील एक सुवर्णयुग हरपल्याची पोकळी निर्माण झाली आहे. अभिनयातील सहजता, भूमिकांमधील विविधता आणि प्रेक्षकांवर अमिट छाप टाकण्याची विलक्षण ताकद धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत दाखवून दिली.
एक पर्व काळाच्या पडद्याआड : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही धर्मेंद्र यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. प्रख्यात चित्रपट अभिनेते तथा माजी खासदार धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमधून भूमिका साकारल्या. चित्रपट रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजविले. पंजाबमधील एका छोट्या गावातून मुंबईत येऊन त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचे एक पर्व काळाच्या पडद्याआड गेले, असे त्या म्हणाल्या.
धर्मेंद्र जी सदैव आपल्या स्मरणात : शेलार
भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, पद्मभूषण धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे, अशा शोकभावना व्यक्त करत माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने, प्रभावी संवादशैलीने आणि हृदयाला भिडणा-या अभिनयाने त्यांनी भारतीय सिनेमाला एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले. आज जरी एक सुवर्णयुग संपले असले, तरी धर्मेंद्र यांच्या अभिनयाची आणि संस्कारांची अमिट छाप सदैव आपल्या स्मरणात राहील.

