भंडारा : शेतक-यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. मुख्यमंत्री साहेब जमले तर एखादी लाडका भाऊ योजना सुद्धा नक्की आणा. अशी मागणी केली आहे भंडा-याच्या एका शेतकरी पुत्राने. शेतक-यांच्या मुलांचे काही कल्याण होईल, अशी एखादी योजना काढावी आणि तरुणांसह शेतकरी पुत्रांनाही दिलासा द्यावा, यासाठी या युवा शेतकरी पठ्ठ्याने चक्क हातात फलक घेत गावाच्या चौकात उभा राहून सा-यांचे लक्ष वेधले आहे. हातात फलक घेऊन त्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली आहे.
राज्य सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यात महिलांना दीड हजार रुपये महिना मानधन देण्यात येणार आहे. याच धर्तीवर शेतकरी पुत्रांसाठी लाडका भाऊ योजना काढावी, अशी या शेतकरी पुत्राची लक्षवेधी मागणी आहे. जयपाल प्रकाश भांडारकर असे पदवीचे शिक्षण घेणा-या या तरुण शेतक-यांचे नाव आहे. जयपाल याच्याकडे सहा एकर स्वत:ची शेती असून त्यात तो भात पिकासह बागायती शेती करून उत्पन्न घेतो. मात्र, शेतकरी आणि त्यांच्या पुत्रांची काय दशा आहे. शेतकरी पुत्रांना विवाहासाठी मुलीही मिळत नसल्याची खंत या युवा शेतक-यांने बोलून दाखविली आहे. या युवा शेतक-यांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केलेल्या अशा प्रकारच्या अभिनव मागणीची आता गावात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र ही भावना गांव खेड्यातील प्रत्येक तरुण शेतकरी तरूणांनाची असल्याची भावना समाजातून व्यक्त केली जात आहे.