22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयपहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली धावणार!

पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली धावणार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी अतिशय जलद आणि सुख सुविधांनी संपन्न अशी वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे. या वंदे भारतला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशात १०० पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन धावू लागल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच कोल्हापूरसाठी हुबळी ते पुणे ही नवी वंदे भारत ट्रेन सुरू केली. त्यामुळे पुणेकर आणि कोल्हापूरकरांचीही सोय झाली आहे. देशातील पहिली वंदे भारत मुंबई-सोलापूर रेल्वे मार्गावर धावली. आता पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनही महाराष्ट्रातून धावणार आहे. पुण्यातून ही ट्रेन धावणार असल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच वंदे भारत स्लीपर प्रोटोटाईप ट्रेनने प्रवास करत ट्रेनची चाचणी केली. यावेळी या ट्रेनचा स्पीड, ट्रेनमधील सुविधांची माहिती देत पुढील ३ ते ४ महिन्यांत पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार असल्याचे सांगितले होते. आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पहिली वंदे भारत स्लीपर कोणत्या मार्गावर धावणार याचे संकेत दिले आहेत. पुणे ते दिल्ली रेल्वे मार्गावर ही पहिली ट्रेन धावणार असल्याची शक्यता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसच्या व्हर्च्युअल लोकार्पण सोहळ््यावेळी ते पुण्यात बोलत होते.

देशात पहिली वंदे भारत ट्रेन मुंबई ते सोलापूर या मार्गावर महाराष्ट्रात धावली. त्यानंतर वंदे भारत ट्रेनचा सुरू असलेला पल्ला वाढत असून देशभरात सध्या १०२ वंदे भारत ट्रेन धावत आहेत. या गाड्यांमधून तब्बल ३ कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला. वंदे भारत ट्रेन सर्वप्रथम १५ फेब्रुवारी २०१९ रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली. वंदे भारत ट्रेनचे मार्ग देशातील २८० हून अधिक जिल्ह्यांना जोडत आहेत. आता वंदे भारत ट्रेनची स्लीपर लवकरच रेल्वे मार्गावर धावणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट लूक समोर आला असून कर्नाटकच्या बंगळुरू येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनची पाहणी केली होती.

रेल्वे मंत्रालयाकडे मागणी
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर रेल्वे पुण्यातून धावावी, अशी मागणी आम्ही रेल्वे मंत्रालयाकडे केली असून लवकरच ती ट्रेन सुरू होईल, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुणे ते दिल्ली हे रेल्वे रुळावरील अंतर १४०० किमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गासाठी पुणे ते दिल्ली ही वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत सुरू होऊ शकते, असे ते म्हणाले.

अहमदाबाद ते भूज धावणार मेट्रो
वंदे भारत स्लीपरसोबतच देशातील पहिली वंदे भारत मेट्रोही धावणार असून, वंदे भारतची पहिली मेट्रो गुजरातच्या भूजपासून अहमदाबादपर्यंत धावणार आहे. रेल्वे मंत्र्यांनीच याबाबतची घोषणा केली आहे. यामध्ये अंजार, गाधीधाम, भचाऊ, समखियाली, हलवद, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया आणि साबरमतीला थांबेल, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR