वैजापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमचा १८ कोटी रुपयांना सौदा केला. त्यातील ४ कोटी रुपये स्वत: हडपले, असा आरोप शिऊर गटाचे उद्धवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
स्व:पक्षाच्या काही सदस्यांवर पैसे खाल्ल्याचा आरोप दानवे यांनी केला होता. यावर निकम म्हणाले, १० ते १७ मार्च या कालावधीत निवडून आलेल्या नऊ सदस्यांना इगतपुरी, ठाणे, नवी मुंबई, कर्जत आणि गोवा अशा विविध ठिकाणी सहलीला नेण्यात आले. तिथे ओलीस ठेवून आमचे मोबाईल काढून घेण्यात आले होते. दानवे यांनी आमचा परस्पर १८ कोटी रुपयांत सौदा केला होता. त्यातील काही रक्कम आगाऊ मिळाली होती, तर उर्वरित रक्कम मतदानानंतर मिळणार होती. त्यातील काही रक्कम ते सदस्याच्या पदरात टाकणार होते. याची चाहूल लागताच आम्ही तातडीने पक्षाचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर आणि आ. मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क केला व आपली भूमिका सांगितली. त्यानंतर आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.
कशी केली सुटका?
आम्हाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करायचे होते, मात्र दानवे यांची भूमिका मान्य नव्हती. कडक पहारा असतानाही १७ मार्चला मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने मी व ललिता सोनवणे यांनी पलायन केले. यानंतर इतरांचीही सुटका झाली. पक्षप्रमुखांनी आम्हाला भाजप किंवा शिंदेसेनेसोबत जाणे उचित ठरणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते; म्हणूनच आम्ही मतदान प्रक्रियेपासून लांब राहिलो असल्याचे संजय निकम यांनी म्हटले आहे.
कशाचा सौदा केला ते सांगावे? : दानवे
आम्ही कोणासोबत आणि कशाचा सौदा केला ते संजय निकम यांनी सांगावे. त्यांना ओलिस ठेवण्याचा प्रश्नच नाही. ते त्यांच्याच गाड्यांमधून फिरत होते. जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रात्री ते कोठे होते, हे देखील निकम यांनी सांगावे. बिनबुडाचा आरोप करणा-यांना मी उत्तर देत नसल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

