38.9 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रपहिल्या टप्प्यातील तोफा १७ तारखेला थंडावणार

पहिल्या टप्प्यातील तोफा १७ तारखेला थंडावणार

लोकसभा निवडणूक, १९ एप्रिल रोजी विदर्भातील ५ मतदारसंघांत मतदान

नागपूर : प्रतिनिधी
वाहने भरून लोकांना प्रचारासाठी घरातून ओढत आणण्याचे दिवस आता संपल्यात जमा आहेत. पूर्वी लाखोंच्या सभा व्हायच्या, पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यानुरूप नेत्यांनीही प्रचाराचे स्वरूप बदलले. छोटेखानी मेळावे घेण्यावर आणि गृहभेटींवर भर दिला जात आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराला अवघे ४ दिवस उरले आहेत. येत्या १७ तारखेला म्हणजे रामनवमीला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

विदर्भात पहिल्या टप्प्यात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांत मतदान होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा एकच खासदार चंद्रपूर मतदारसंघातून बाळू धानोरकार यांच्या रूपाने निवडून आला होता. आता धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथे भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार मैदानात आहेत. मुनगंटीवारांच्या प्रचारात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर दिसत नाहीत तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ८ दिवस झाले तरी चंद्रपूर मतदारसंघात फिरकले नाहीत.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यात थेट लढत रंगली आहे. नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत आहे. वंचितने ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. शहरात गडकरी हे विकासाच्या मुद्यावर मते मागत आहेत. दहा वर्षांत राबवलेल्या योजना आणि पुढील पाच वर्षांचा रोडमॅप ते जनतेसमोर ठेवत आहेत. येथे कॉंग्रेसची ताकदही मोठी आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते विकास ठाकरेंच्या मागे असल्याने विकास ठाकरे यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नागपूरमध्ये २६ उमेदवार रिंगणात
नागपूरमध्ये एकूण २६ उमेदवार रिंगणात आहे. भाजप, काँग्रेसचे उमेदवार आणि बसपचे योगीराज लांजेवार यांचा अपवाद वगळता इतर कुठल्याच पक्षाचे अस्तित्व नाही. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र ‘वंचित’चा एकही कार्यकर्ता काँग्रेसच्या प्रचारात सहभागी झाला नाही. प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा गडकरी यांच्या विरोधात सभा घेतली नाही.

रामटेकमध्ये नाट्यमय घडामोडी
रामटेक लोकसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी अद्यापही सुरुच आहेत. येथील काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला तर वंचितने आधी उमेदवारी दिलेले शंकर चहांदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ‘वंचित’लाच धक्का दिला. आता काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे आणि महायुतीचे राजू पारवे अशी थेट लढत होत आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार बर्वे यांच्यासाठी एकटेच लढत आहेत. दुसरीकडे किशोर गजभिये यांना वंचितने पाठिंबा दिल्याने त्यांनीही आव्हान उभे केले आहे.

गडचिरोलीतही चुरस
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात खरी लढाई महायुतीचे अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे डॉ. नामदेव किरसान यांच्यात आहे. गडचिरोलीतील दोन्ही उमेदवार बाहेरचे आहेत. भाजपचे नेते नागपूर जिल्ह्यातील तर काँग्रेसचे डॉ. किरसान गोंदियाचे आहेत. दोघांनाही विरोधी कार्यकर्ते बाहेरचे पार्सल म्हणून टोमणे मारत आहेत. मात्र, कॉंग्रेसमध्ये फाटाफूट झाल्याने याचा नेमका कोणाला फायदा होतो, हे पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR