नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमदेवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी. राधाकृष्णन विजयी झाले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. सीपी. राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली. तर, इंडिया आघाडीचे उमदेवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली.
१४ मते बाद झाली आहेत, असे राज्यसभा सचिवालयाने जाहीर केले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल माझ्या बाजूने आला नसला तरी स्वीकारला असून महत्त्वाच्या उद्देशासाठी संघर्ष सुरुच राहील असं बी. सुदर्शन रेड्डी म्हणाले.
आज खासदारांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांचा मताधिकार नोंदवला. निवडणुकीचा जो निकाल लागला आहे तो विनम्रपणे आणि महान गणराज्याच्या लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवत स्वीकारत आहे. संविधानिक नितिमत्ता, न्याय आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या मुल्यांनी माझ्या जीवनात मार्ग दाखवला, त्याच्यावर मी चाललो, त्या मूल्यांसाठी लढण्याची संधी मिला मिळाली. जरी निकाल माझ्या बाजूने आलेला नसला तरी मोठ्या उद्देशासाठी सामुदायिकपणे लढत राहू. वैचारिक संघर्ष ताकदीने सुरूच राहील.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त उमेदवार म्हणून संधी दिली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपली लोकशाही फक्त विजयाने मजबूत होत नाही तर संवाद, मतभिन्नता आणि सहभाग याने मजबूत होते. नागरिक म्हणून आणि समता, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य आदर्शाचे रक्षण करण्यास कटिब्ध आहे. आपल्या राष्ट्रीय जीवनासाठी संविधान मार्गदर्शन करत राहो.