मुंबई : प्रतिनिधी
शिंदे गटातील ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर आणि आणखी एक ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून, दोन्ही नेत्यांचा टीकेचा स्तर आता घसरला आहे. किर्तीकर यांनी शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रामदास कदम यांचा गद्दार उल्लेख केला होता. त्यानंतर रामदास कदम यांनी या टीकेला जशास तसे उत्तर देताना गजानन किर्तीकर भ्रमिष्ट असून, त्यांना डॉक्टरांच्या उपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे. शिंदे गटातील या दोन ज्येष्ठ नेत्यांत शाब्दिक वाद सुरू असताना या गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मौन बाळगून आहेत.
लोकसभेच्या उमेदवारीवरून शिंदे गटातील या दोन नेत्यांत वादाची ठिणगी पडली होती. या वादाची सुरुवात रामदास कदम यांनी केली. कारण त्यांच्या पुत्रासाठी त्यांनी थेट गजानन किर्तीकर यांनी माघार घ्यावी, असे म्हटले होते. त्यावरून किर्तीकर आक्रमक झाले आणि त्यांनी थेट रामदास कदमांवर हल्लाबोल केला. या वादाची मालिका सुरूच असून, दोन्ही नेत्यांतील हा वाद आता टोकाला गेला आहे. एकीकडे किर्तीकर यांनी थेट रामदास कदमांवर गद्दारीचा आरोप करीत त्यांनी नेहमीच आपल्या विरोधात कट-कारस्थान केल्याचे म्हटले होते. यावरूनच किर्तीकरांनी त्यांना गद्दार असे संबोधले होते.
त्यानंतर आता रामदास कदमही आक्रमक झाले. त्यांनी किर्तीकरांच्या आरोपांना उत्तर देताना आज गजानन कीर्तिकर भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे, असे म्हटले. दिवाळीत शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये फटाके फुटत आहेत. हे पक्षासाठी भूषणावह नाही. कीर्तिकरांचे वय ८० ते ८५ आहे. त्यामुळे ते भ्रमिष्ट झाले आहेत, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले. १९९० मध्ये मी कांदिवलीचा शाखाप्रमुख होतो. मला शिवसेनाप्रमुखांनी खेडमधून विधानसभेचे तिकीट दिले होते. मी खेडमध्ये उमेदवार असताना यांना पाडण्यासाठी कांदिवलीत कधी आलो, कीर्तिकर बेईमान आहेत. त्यांना हे शोभत नाही. ३३ वर्षांनी माझी बदनामी करण्यासाठी खोटी प्रेसनोट काढली आहे,
गद्दारांची औलाद आमची नाही
गद्दारीची औलाद आमची नाही, ती गजानन कीर्तिकरांची असेल. मुलाला निवडून आणण्यासाठी पक्षाशी बेईमानी करण्याचे काम कीर्तिकर करत आहेत. पितळ उघडे पडल्याने आता त्यांचे पित्त खवळले आहे. घरची भांडणे घरातच मिटली पाहिजे होती. मात्र, अशाप्रकारे शिमगा करून पक्षाची इज्जत घालवण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत रामदास कदम यांनी किर्तीकरांवर हल्लाबोल केला.