छत्रपती संभाजीनगर : कोलकात्यामध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातही या घटनेचा निषेध केला जात आहे. ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. डॉक्टरांनीही संप पुकारला आहे, त्यामुळे शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एक घटना घडली अन् देश हादरला आहे. कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातही याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत.
तसेच डॉक्टरही संपावर गेले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील मार्ड संघटनेच्या निवासी डॉक्टरांचा संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. मागच्या पाच दिवसांपासून हे काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शहरातील दोन्ही शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागतेय. तर उपचार न मिळाल्याने काही रुग्णांना परत जावे लागत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णांचे हाल
छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील ५३२ तर मिनी घाटीतील ३२ डॉक्टर हे संपावर आहेत. वरिष्ठ डॉक्टर केवळ अत्यावश्यक रुग्णांवर उपचार करत असल्याने अनेक रुग्णांना उपचाराअभावी माघारी फिरावे लागत आहे. दरम्यान सुरू असलेल्या या आंदोलनामुळे घाटी रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
जेजे हॉस्पिटलमधून निषेध
मुंबईमधील जेजे हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांकडून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रीय स्तरावर डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एक कडक कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
पुण्यात कामबंद आंदोलन
पुण्यातही कोलकात्याच्या घटनेचे परिणाम दिसून येत आहेत. देशभरात आयएमए कडून आज संप पुकारण्यात आला आहे. कोलकात्यात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आज काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बाहेर आयएमए आणि निवासी डॉक्टरांकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पुण्यात खाजगी डॉक्टरांनी देखील वैद्यकीय सेवा आणि ओपीडी बंद केली आहे.
नांदेडमध्ये डॉक्टरांचे आंदोलन
कोलकाता घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये शेकडो डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेची सीबीआय चौकशी करून आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तपासात पोलिसांनी हलगर्जी केल्याचा डॉक्टर आंदोलकांचा आरोप आहे. डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून खून केल्या प्रकरणी देशभरात पडसाद उमटत आहेत.
नागपुरातही पडसाद
उपराजधानी नागपुरातील एम्स रुग्णालयाचे निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर, आंतरवासिता डॉक्टर, पदवीचे विद्यार्थीही पहिल्यांदाच संपात सहभागी आहेत. कोलकात्यात सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ मेडिकल, मेयो शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर १३ ऑगस्टपासून संपावर आहेत.
जळगावमध्ये निषेध मोर्चा
पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जळगाव शहरात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे कॅण्डल मार्च काढण्यात आला. वैद्यकीय शिक्षण घेणा-या डॉक्टरांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.