मुंबई : प्रतिनिधी
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असताना, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जयंत पाटील यांची सोमवारी रात्री भेट झाल्याची बातमी बाहेर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र स्वत: जयंत पाटील आणि बावनकुळे यांनी मतदारसंघातील काही कामांसाठी ही भेट झाली. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण केले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने या पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये अस्वस्थताने. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील दिशेबाबत सतत वावड्या उठत असतात. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी वारंवार निमंत्रण देऊनही जयंत पाटील थोरल्या पवारांसोबत राहिले.विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार आल्यानंतरही जयंत पाटील आपल्या सोबत यावेत यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरू होते. पण अजित पवार यांच्यासोबत जाण्याऐवजी ते भाजपातच जाणार असल्याची कुजबुज सतत सुरू आहे.
राज्यातील महायुती सरकारवर प्रखर टीका करण्याचे ते टाळतात असा पक्षातील काही लोकांची तक्रार असते. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेले असताना हा सरकारचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत काहीही तिखट प्रतिक्रिया देण्याचे जयंत पाटील यांनी टाळले होते. त्यातच मध्यंतरी त्यांच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित केल्याने या चर्चेला बळ मिळाले होते. त्यातच सोमवारी रात्री भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची व जयंत पाटील यांची भेट झाली व यावेळी राधाकृष्ण विखे पाटील हे ही उपस्थित होते अशी बातमी बाहेर आल्याने खळबळ उडाली होती. महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार असे तर्क वितर्क सुरू झाले होते.
मतदारसंघातले प्रश्न घेऊन त्यांना भेटलो : जयंत पाटील
भेटीची बातमी बाहेर आल्यानंतर स्वत: जयंत पाटील हे प्रसार माध्यमांसमोर आले व त्यांनी याबाबत स्पष्टीकरण केले. सोमवारी संध्याकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि माझी त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. सांगली जिल्ह्यातील काही महसूल प्रश्नांवर मी त्यांना १० ते १२ निवेदने दिली. ती निवदेने देण्यासाठीच मी भेट मागितली होती. महसूल विभागात काही गोष्टी ऑनलाइन केल्या आहेत त्याचा त्रास शेतक-यांना होतो आहे. त्याकडे त्यांचे लक्ष वेधले. आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते. मला ६ वाजण्याची वेळ दिली गेली होती. आमच्यात २५ मिनिटं चर्चा झाली. राधाकृष्ण विखे पाटीलही होते. आमची कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. मी इतर चर्चा कुठलीही केलेली नाही. माझ्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन त्यांना भेटलो असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. नंतर बावनकुळे यांनीही ही भेट राजकीय नव्हती. खात्याच्या कामासंदर्भात ते भेटले, असा खुलासा केला.