कुर्डुवाडी : पोटच्या सहा वर्षांच्या मुलाचे कुन्हाडीने दोन तुकडे करून त्याला मारून टाकले आणि स्वत:ही तणनाशक विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील कव्हे येथे घडली.
या प्रकरणी नारायण जगन्नाथ चोपडे (वय ५७, रा. कव्हे, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे. प्रणव गणेश चोपडे (वय ६) असे मयत मुलाचे नाव असून, कौशल्या उर्फ कोमल चोपडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. फिर्यादीत नारायण जगन्नाथ चोपडे यांनी म्हटले आहे की, फिर्यादी नारायण व पत्नी पार्वती दुचाकीवरुन पाचपिंपळे (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे नातलगाच्या लग्नासाठी गेले होते. दुपारी १२:२० च्या सुमारास फिर्यादीची सून कौशल्या (कोमल) हिचा फिर्यादीला फोन आला. तिने ‘मी त्याला घरातच छाटले आहे’, असे सांगितले. मुलगा गणेश याने मी आताच घरी आलो आहे, कौशल्या विषारी औषध पिऊन घरासमोर लोळत आहे, असे सांगितले. त्यानंतर कौशल्या हिला तिचा भाऊ नवनाथ याने हॉस्पिटलमध्ये नेले. सून कौशल्या हिच्यावर गुन्हा नोंदला आहे.