28.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरमराठी राजभाषा विभागाला सहा वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मान्यताच नाही

मराठी राजभाषा विभागाला सहा वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मान्यताच नाही

सोलापूर : राजभाषा विभाग हा शासनमान्यच असावा असा प्रत्येक राज्यातील नियम आहे. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मराठी राजभाषा विभागाला सहा वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मान्यताच मिळालेली नाही. त्यामुळे एमए-मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच हजार रुपयांचे शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागतोय. शासनाची मान्यता नसल्याने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

राज्यात दरवर्षी लाखोंचा खर्च करून मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला कल पाहता मराठीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढणे जरुरी आहे. त्यासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कन्नड माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्नाटक सरकारकडून दरवर्षी प्रोत्साहनपर प्रत्येकी २५ हजार रुपयांची फेलोशिप दिली जाते.

पण, महाराष्ट्रातील विद्यार्थी सोलापूर विद्यापीठात मराठीतून एमए चे शिक्षण घेताना त्याला मात्र ना शिष्यवृत्ती ना फेलोशिप मिळते, उलट त्याला प्रवेशासाठी पाच हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते, अशी स्थिती सोलापूर विद्यापीठातील आहे. मराठी राजभाषा दिन साजरा करताना अशा विदारक स्थितीचा देखील सरकारने विचार करावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे.

कन्नड माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून कर्नाटक सरकारकडून एमए- कन्नडचे शिक्षण घेणाऱ्यांना दरवर्षी २५ हजार रुपयांची फेलोशिप दिली जाते. दुसरीकडे मात्र मराठी विषयातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांची पदरमोड करून प्रवेश घ्यावा लागतोय. सोलापूर विद्यापीठातील मराठी विभागाला २०१८-१९ पासून मान्यताच नाही. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्तीचा देखील लाभ मिळत नाही. विद्यापीठातील मराठी राजभाषा विभागाला शासनाची मान्यता मिळावी, असा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे पाठविला आहे, पण अजून त्याला मान्यता मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असून लवकरच मान्यता मिळेल, अशी आशा आहे. असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगीतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR