19.3 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्र३ वर्षांपासून बेपत्ता वृद्धाचा फोटो झळकला मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत

३ वर्षांपासून बेपत्ता वृद्धाचा फोटो झळकला मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत

मुंबई : राज्य सरकारकडून सध्या योजनांची चलती असून लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि वयोवृद्धांसाठीही योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ६० वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून देशभरातील ६६ तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणा-या प्रवाशांना ३० हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा केली आहे.

आता, या योजनेच्या संदर्भाने केलेल्या एका जाहिरातीवरुन सरकावर टीका होत आहे. कारण, तीर्थक्षेत्र योजनेच्या जाहिरातीवर वापरण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहता, ती व्यक्ती ३ वर्षांपासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावरुन, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्­यांवर टीका केली आहे.

आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले तीन वर्षापासून आपल्या कुटुंबापासून बेपत्ता होते, त्यांचा कुटुंबाने सर्वत्र शोध देखील घेतला. परंतु, तांबे कुटुंबीयांना ज्ञानेश्वर तांबे आढळून आले नाहीत, अखेरीस तीन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबीयांस धक्काच बसला आहे.

याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की, आमचे वडील गेले तीन वर्षापासून हरवले होते आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो. परंतु ते सापडत नव्हते, आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे, मुख्यमंत्री ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे, त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे ही विनंतीही तांबे यांच्या पुत्राने केली आहे.

सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्­यांवर टीका
मुख्यमंत्र्­यांनी कितीही कंठशोष करुन सांगितले तरीही हे सरकार सर्वसामान्य नसल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्­यांच्या कृतीतून दिसून येते. कारण, हे सरकार जाहिरातबाजी करणारे सरकार आहे, चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असं हे सरकार आहे. वारक-यांच्या संबंधाने जी पर्यटन योजना सरकारने जाहीर केली, त्यातही स्वत:चीच पाठ थोटपून घेतली जात असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटले. यावेळी, त्यांनी जाहिरातीवर लावण्यात आलेल्या फोटोचाही संदर्भ दिली. पुण्याच्या शिरुरमधील ज्ञानेश्वर तांबे नामक व्यक्तीचा फोटो या जाहिरातीवर लावण्यात आला आहे. मात्र, ते बेपत्ता असून तांबे कुटुंबीय गेल्या ३ वर्षांपासून शोधत होते. जेव्हा ज्ञानेश्वार तांबे यांचे चिरंजीव भरत तांबे यांनी तक्रार केली, तेव्हा हे सरकार स्वत:च्या जाहिरातीसाठी लोकांच्या भावनांशी खेळते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असेही अंधारे यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR