23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeसोलापूरभोयरे बंधाऱ्यावरील संरक्षक कठडे व पाईप गायब

भोयरे बंधाऱ्यावरील संरक्षक कठडे व पाईप गायब

मलीकपेठ / प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील उत्तर भागातून वाहत असलेल्या भोगावती नदीवरील भोयरे (ता. मोहोळ) येथील कोल्हापूर पध्द‌तीच्या बंधाऱ्यावरील दोन्ही बाजूचे संरक्षक लोखंडी पाईप व सिमेंटचे कठडे मोडाल्याने वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी संबंधित विभागाने अपघात होण्यापूर्वीच संरक्षक कठडे व लोखंडी पाईप बसवावेत, अशी मागणी प्रवाशी व वाहनधारकांतून जोर धरत आहे.

या पुलावर लहान मोठ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. सोलापूरला कमी वेळेत जाण्यासाठी हा महत्वाचा रस्ता असल्याने वाहनांची ये-जा दिवस रात्र चालू असते. या बंधाऱ्यावरून खुनेश्वर, हिंगणी, भांबेवाडी, शिरापूर, लांबोटी यासह आदी ठिकाणी जाण्यासाठी या बंधार्‍यावरील रस्त्याचा वापर वाहनधारकांना करावा लागत आहे. भोयरे नदीवरील भोयरे येथील कोल्हापूर पध्द्‌तीच्या बंधारा हा २५-३० वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून वरचेवर हा बंधारा प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे, या बंधार्‍यावरून एका वेळेस एकच वाहन जात आहे.

या बंधाऱ्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी संरक्षक लोखंडी पाईप व सिमेंटचे कठडे बांधण्यात आले होते. मात्र, मागील तीन ते चार वर्षांपासून दोन्ही बाजूचे पाईप व कठडे मोडून पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना व वाहनधारकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यापूर्वी अनेक लहान मोठे अपघात या बंधान्यावर घडले असून याची कल्पना संबंधित प्रशासनालादेखील आहे. रात्री-अपरात्री तर बंधाऱ्यावरून ये-जा करताना खड्डे असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही.प्रवासी व वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय.

भोयरे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील संरक्षक कठडे व पाईप मागील तीन-चार वर्षांपूर्वी मोडून पडले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावरून वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून तातडीने काम करावे अशी मागणी होत आहे.

भोयरे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक पाईप व कठडे असणे आवश्यक आहे मात्र मागील अनेक वर्षांपासून ते मोडले आहेत. अपघात होऊन एखाद्या गरीबाचा जीव जाण्यापूर्वी संबंधितांनी संरक्षक कठडे व पाईप बसवावे.अशी मागणी होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR