जालना : प्रतिनिधी
मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जे लोक हिंसाचार करत आहेत, ते मराठा समाजातील नाहीत. जाळपोळ करू नका, हिंसा करू नका. हे कोण करत आहे, याची मला शंका येत आहे. मला कुठेही जाळपोळ व्हायची किंवा हिंसेची माहिती मिळाली तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.जाळपोळीच्या घटनेचे मी कधीही समर्थन करत नाही, असे सांगतानाच यामागे सत्ताधारी नेतेच असल्याची शंका मला येते. शांततेने सुरू असलेल्या आंदोलनाला डाग लावण्याचा सत्ताधारी प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
सध्या जी जाळपोळ सुरु आहे, ती तात्काळ थांबवावी. नाही तर मला नाईलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल. गोरगरीब मराठ्यांना हे अपेक्षित नाही. हिंसक आंदोलन कोण करीत आहे, याची मी चौकशी करणार आहे. मला शंका आहे की सत्ताधारी नेतेच स्वत:च्या कार्यकर्त्यांच्या हाताने आपली घरे जाळून घेत आहेत. मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनाला डाग लावण्याचा सत्ताधारी प्रयत्न करत आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षण मिळेपर्यंत शांततेत आंदोलन करायचे आहे. मला त्रास होईल, असे काही करु नका. मराठा समाजाने याची काळजी घ्यावी. उद्रेक करण्याची गरज नाही. तिस-या आणि चौथ्या टप्प्यात सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. जे हिंसाचार करत आहेत, ते सामान्य कार्यकर्ते नाहीत. हे सरकारचे कार्यकर्ते असल्याची शंका आहे. सगळ््यांनी जाळपोळ बंद करावी, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागेल
आज रात्रीतून सर्व जाळपोळ थांबावी अन्यथा उद्या मला वेगळा निर्णय घ्यावा लागू शकतो. समाजाला माझा जीव महत्त्वाचा वाटत असेल तर मी मान राखून पाणी पितो. पण राज्यात शांतता ठेवावी. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. पण आरक्षण घेईपर्यंत आमरण उपोषण थांबवू शकत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.