करमाळा : उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा) ते कळाशी (ता. इंदापूर) या दरम्यान बोट उलटून झालेल्या अपघातात झरे (ता. करमाळा) येथील पती-पत्नी व त्यांची दोन लहान मुले तसेच कुगाव (ता. करमाळा) येथील दोघे, असे सहा जण बुडाले आहेत. या दुर्घटनेत एकजण कळाशीकडे पोहत आल्याने बचावला असून इतरांचा शोध अद्यापही सुरू आहे. दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणात शोधकार्यास व्यत्यय निर्माण झाला आहे.
मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे येत होती. त्यात कुगाव व झरे (ता. करमाळा) येथील सात प्रवासी होते. यावेळी जोरदार वादळ सुटल्याने ती बोट उलटली. कुगाव ते काळाशी दरम्यान दररोज या बोटीने प्रवासी वाहतूक केली जाते. दिवसातून साधारणत: ही बोट १० ते १५ फे-या मारते. मात्र, मंगळवारी सायंकाळी बोट बुडून मोठी दुर्घटना घडली. धरणात बुडाल्यांमध्ये एक महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या बोटीतील एकजण पोहून कडेला आला. पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरे असे यातून वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. बोट उलटल्यानंतर त्यांनी धाडसाने पोहत पोहत कळाशीकडे काठ गाठला व आपला जीव वाचवला. ही सर्व घटना पाहून ते अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होते. राहुल डोंगरे यांना प्राथमिक उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. डोंगरे यांनी धाडसाने पाण्याबाहेर पोहत येऊन ही घटना कळाशी ग्रामस्थांना सांगितली.
बोट उलटून बुडाल्यांची नावे
गोकूळ दत्तात्रय जाधव (३०), कोमल गोकूळ जाधव (२५), शुभम गोकूळ जाधव ( दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत.
चार बोटींच्या माध्यमातून शोधकार्य
या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशिवाय करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे. बोट उलटून बुडलेल्यांचा चार बोटींच्या माध्यमातून शोध सुरू आहे. तसेच एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत शोध मोहिम सुरूच होती. मात्र, अंधारामुळे काहीही हाती लागले नाही. बुधवारीही शोधकार्य सुरू आहे, रात्री उशिरा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्याविषयी माहिती घेतली.