परभणी : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आज स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू तसेच आमदार बच्चू कडू यांनी एकत्रितरित्या पाहणी केली. मानवत तालुक्यातील रामेटाकळी आणि वझुर या गावात त्यांनी भेट दिली. यावेळी शेतक-यांनी त्यांच्या समोर आपला आक्रोश सांगितला तसेच प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी या सर्वांना बच्चू कडू आणि राजू शेट्टी, संभाजी राजेंनी चांगलेच धारेवर धरले. तर एकीकडे शेतक-यांचे आतोनात नुकसान झालेले असताना दुसरीकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे आयोजित केलेल्या कार्यक्रमावर तिन्ही नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
राजू शेट्टी म्हणाले की, प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. जवळजवळ सात ते आठ दिवस झाले तरी इथे पंचनामे केलेले नाहीत. खरंतर २४ तासांच्या अनुग्रह अनुदान मिळणे अपेक्षित होते. शेतक-यांचे आतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु अजूनपर्यंत शेतक-यांना मदत मिळाली नाही. इथून ५० किलोमीटरच्या अंतरावर कृषिमंत्री मोठा सांस्कृतिक कार्यक्रम करतात आणि इथे लोकांचा रोष सुरु आहे. कृषी मंत्र्यांना लाज वाटायला हवी. आता लोकांनी जोडे हातात घेऊन उभे राहील पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. तर, बच्चू कडे म्हणाले की, कलेक्टर काय करताय हे मला माहित नाही. ते म्हणताय नुकसान इतके झाले की आम्ही मदत देऊ शकत नाही. तलाठ्यांनी तीन तारखेला पंचनामा केले आणि आजपर्यंत दाखल केलेले नाहीत. तर पंचनामे करून अर्थ काय? सरकारच्या कानफाडात मारण्याची वेळ आली असल्याची टीका त्यांनी केली.
कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न : संभाजीराजे
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, त्यांनी इथे येऊन बघावं. मी शेतात जाऊन पाहणी केली. मी गाडीतून पाहणी केलेली नाही. बाकी आमदार, खासदारांना इथे यायला वेळ नाही का? कृषिमंत्र्यांनी तर इथे यायलाच पाहिजे ना. तुम्ही कृषिमंत्री आहात. हा विषय इतका नाजूक बनला आहे की, अशा वेळेस कृषिमंत्र्यांनी इथे येऊन शेतक-यांचे अश्रू पुसायला हवेत. कृषिमंत्री इकडे यायचे सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. हे बरोबर आहे का? हे महाराष्ट्राला शोभते का? कृषिमंत्र्यांना शोभते का? अशी टीका त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर केली.
अहवाल प्राप्त होताच मदत देण्यात येईल : मंत्री अनिल पाटील
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीन, कापूस आणि ऊस आदि पिकांसह कृषि साहित्य आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्यांचे अहवाल प्राप्त होताच शासनाकडून मदत देण्यात येईल, असे आश्वासन मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज परभणी दौ-यात बोलताना दिले. नांदेड, हिंगोलीनंतर परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित आहेरवाडी व माटेगाव येथील भागाची आज त्यांनी पाहणी केली. त्यावेळी पाटील बोलत होते.