35.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeलातूरगावकरी लुटतायत वनभोजनाचा आनंद!

गावकरी लुटतायत वनभोजनाचा आनंद!

लातूरमध्ये वनलक्ष्मीची पूजा

लातूर : शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी आज वेळ अमावास्या दिवशी तिची मनोभावे पूजा केली जाते. आज गावातील सर्व लहान-थोर शेतात वनभोजनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. आज लातूर शहरात जणू अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती दिसत आहे. बैलपोळा आणि वेळ अमावास्या हे सण शेतक­-यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जातात. बैलपोळ्या दिवशी ज्याच्या जिवावर शेती चालते, त्या बैलांना खाऊपिऊ घालून पूजा केली जाते तर वेळ अमावास्येच्या दिवशी ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्या काळया आईची पूजा केली जाते.

लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीतही वेळ अमावास्येच्या दिवशीची पूजा महत्त्वाची मानली जाते. या दिवशी शेतात कडब्याची कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा मांडली जाते, शेतात खरीप आणि रबी या दोन हंगामात मिळून वेळ अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. कडब्याच्या कोपीत लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात, यथासांग पूजा केली जाते, शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो, रबी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफूल आदी पिकांत चर शिंपून ‘रबीचा हंगाम चांगला होऊ दे’ अशी प्रार्थना केली जाते.

पेरणीनंतरची सातवी अमावास्या म्हणजे वेळ अमावास्या. जूनमध्ये पेरणी होते, सातवी अमावास्या डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवड्यात येते. खरिपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते, तूरही ऐन बहरात असते. रबी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेत हिरवेगार झालेले असते. उन्हाची तीव्रता नसते. वेळ अमावास्येच्या काळात लातूरसारख्या शहरी भागात तर रस्त्यावर कर्फ्यूसारखे वातावरण दिसते. आपल्यापेक्षा कोणीतरी अज्ञात शक्ती मोठी आहे. त्यासमोर वर्षातून एकदा तरी नतमस्तक व्हावे याची शिकवणूक देणारी संस्कृती जोपासायची परंपरा या निमित्ताने पहायला मिळते.

वेळ अमावास्येची मेजवानी
रबी हंगामातील पेरणी केलेल्या रानात उंडे, अंबीलचा काला तसेच पाण्याचा चर शिंपडला जातो. ज्वारी, बाजरीचे उंडे, सर्व भाज्यांपासून तयार केली जाणारी भाजी, अंबील या पदार्थांना वेळ अमावास्येच्या दिवशी जेवणात पहिल्या दर्जाचा मान असतो, याव्यतिरिक्त जो तो आपल्या कुवतीप्रमाणे अन्य पदार्थ तयार करतो. नुकताच आलेला वाटाणा, तुरीचे दाणे घालून केलेली भाजी,(भज्जी), तिळगूळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी-बाजरीची भाकरी, धपाटे, भात, ताकाला ज्वारीचे पीठ लावून केलेली अंबील, अशा पदार्थाचा आस्वाद घेण्यात येतो. अंबील, गव्हाची खीर, भज्जी, भाकरी, कुटलेली शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा सोबतच बोरं, पेरू, हरभरे असे असंख्य पदार्थ असतात. जेवण्याच्या आधी या रानमेव्यानेच पोट भरून जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR