38.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रप्रचारात हवामान उमेदवारांचा घाम काढणार!

प्रचारात हवामान उमेदवारांचा घाम काढणार!

महाराष्ट्र होरपळण्यास सुरुवात सलग ३ दिवशी सोलापुर सर्वांधिक ४३.२, तर लातूर ३८ अंशावर

पुणे/मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापले असून राज्यातही हवामानात मोठा बदल झाल्याने उष्णतेत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा दिवसागणिक खालावत चालला असतानाच राज्यातील अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: टाहो सुरू आहे.

ही भयावह परिस्थिती एका बाजूने असतानाच अवघा महाराष्ट्र आता उष्णतेच्या लाटांनी होरपळून निघाला आहे. राज्यातील अनेक शहरात उन्हाचा पारा चाळीशीत जाऊन पोहोचला आहे. अशातच पहिल्या टप्प्यातील अर्ज सादर करण्याची मूदत संपली असून आता निवडणूकीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रचारासाठी लगबग सुरू झालेली आहे. मात्र याचबरोबर उन्हाळा सुरू झाल्याने राज्यभरात जणूकाही उष्णतेची लाट आल्याने या निवडणूकीत उमेदवारांना घाम तर गाळावा लागणारच तर त्यासोबत कडक उन्हाचा सामनाही करावा लागणार आहे.

राज्यात सर्वांधिक सोलापूरमध्ये तब्बल ४३ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचल्याने अंगाची लाहीलाही झाली. राज्यातील अनेक शहरांमध्ये चाळिशीच्या पार पारा गेल्याने अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती आहे. हवामान विभागाकडून गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. जेऊरमध्ये ४२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. कोल्हापूर मध्ये ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
सोलापूर – ४३.२
परभणी – ४१.३
बीड – ४१.२
जेऊर – ४२
पुणे – ३९.६
उदगीर – ४०.१
संभाजीनगर – ३९.५
जळगाव – ३९.४
लातूर – ३८
नाशिक – ३७.२
सांताक्रुज – ३५.८
बारामती – ३९.१
कोल्हापूर – ४०.२
अहमदनगर – ३८.८
धाराशिव – ४०.६
मालेगाव – ४०.८

उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाकडून इशारा
दि. ७ ते १० एप्रिल दरम्यान विदर्भ, किनारी आंध्र प्रदेश आणि यानाम, रायलसीमा, गंगा पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, झारखंड, उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि ओडिशा या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यात ७ ते १० एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वा-यासह पावसाची शक्यता.

विदर्भात ऑरेंज अलर्टसह गारपीटीची शक्यता
राज्यात ७ ते १० एप्रिल दरम्यानय यवतमाळ, वाशिम, अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसह गारपीट होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR