पूर्णा : कानडखेड रस्त्याचे काम करणारा ठेकेदार चांगला असून निधी उपलब्ध होण्यात काही तांत्रिक, किरकोळ विलंब झाला तरी रस्त्याचे काम कुठेही थांबणार नाही. ठरलेल्या वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने येत्या ६ महिन्यांच्या कालावधीत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिली.
पूर्णा तालुक्यातील कानडखेड २ येथील नागरिकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्त्याची मागणी अखेर मार्गी लागली आहे. आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते दि. ६ नोव्हेंबर रोजी एसएच ६१ ते कानडखेड २ या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी भूमिपूजन सोहळ्यानंतर बोलताना आ. गुट्टे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी पूर्णा तालुक्यातील कानखेड-१ आणि २ या गावक-यांपर्यंत प्रत्यक्ष येऊ शकलो नव्हतो. मात्र, नागरिकांनी माझ्यावर दृढ विश्वास दाखवून मला भरभरून मतदान केले. त्यामुळेच अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. आज या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना मनापासून समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
या भूमिपूजन सोहळ्यास पूर्णा पंचायत समितीचे सभापती नारायण पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे, पूर्णा नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटी कदम, सरपंच सैनाजी माठे, साहेबराव भाकरे, साहेबराव वाटोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मारोतराव बनसोडे, मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक नंदकुमार डाखोरे, सुनील नागरे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कानखेडचे सरपंच प्रताप बखाल आणि त्यांच्या सहका-यांनी विशेष परिश्रम घेतले.
















