अयोध्या : राम मंदिर उद्घाटन सोहळा दोनच दिवसावर आला आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात महागडे रामायण अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्यात आले आहे. या रामायणाची किंमत १.६५ लाख रुपये आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अनेक वस्तू राम मंदिरात येत आहेत. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडत आहे. अशीच एक खास गोष्ट अयोध्या राम मंदिरापर्यंत पोहोचली आहे. ही गोष्ट म्हणजे रामायण आहे. या रामायणाला जगातील सर्वात महागडे रामायण म्हटले जात आहे. हे रामायण पुस्तक विक्रेते मनोज सती यांनी आणले आहे. सध्या हे जगातील सर्वात सुंदर आणि महागडे रामायण असल्याची माहिती मनोज सती यांनी दिली.
या रामायणात नेमकं खास काय?
अत्यंत खास सामग्रीसह तयार करण्यात आलेल्या या रामायणाची रचनाही बांधकामाधीन राम मंदिरासारखीच आहे. ज्यामध्ये तीन मजले बांधले जात आहेत. रामायणाची बाहेरची पेटी तयार करण्यासाठी अमेरिकन अक्रोड लाकडाचा वापर करण्यात आला आहे. कव्हरमध्ये आयात केलेले साहित्य वापरण्यात आले आहे. तर जपानमधील सेंद्रिय शाईचा वापर करण्यात आला.
विशेष म्हणजे या रामायणात वापरलेला कागद हा फ्रान्सचा आहे. जे पूर्णपणे अॅसिड मुक्त आहे. हा एक प्रकारचा पेटंट पेपर आहे. हा कागद फक्त या पुस्तकासाठी वापरला असून बाजारात उपलब्ध नाही. या रामायणाच्या प्रत्येक पानाला वेगळी रचना देण्यात आली आहे. जेणेकरून वाचकांना अधिक चांगला अनुभव घेता येईल.
जवळपास ४०० वर्षापर्यंत टिकू शकते
मनोज सती यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रामायण जवळपास ४०० वर्षापर्यंत टिकू शकते. त्याचे मुखपृष्ठही अतिशय सुंदर आहे. यासाठी कपाटही तयार करण्यात आले आहे. जेणेकरून ते वर्षानुवर्षे सुरक्षित ठेवता येईल.