लातूर : येथील महानगरपालिका, विलासराव देशमुख फाऊंडेशन व कृषि महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने क्रिडासंकुल परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्रिडासंकुल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजीव गांधी चौक या भागात सहाशे तरुणी तरुणांनी स्वच्छ लातूर सुंदर लातूर हा नारा देत भल्या पहाटेच स्वच्छता मोहीम राबवली. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी श्रीमती अहिल्या गाठाळ, कृषि महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख अतिथी म्हणून राजकुमार जाधव, मुख्य वसतिगृह अधिक्षक डॉ.व्यंकट जगताप, डॉ.मोहन धुप्पे, समन्वयक म्हणून संगीता मोळवणे व श्रीमती मनीषा गुरमे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना कृषि महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, तरुणांनी श्रम संस्काराचे व्रत अंगीकारणे आवश्यक आहे.
स्वच्छता व सुंदरता या मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक आहे. पुढे त्यांनी असे प्रतिपादन केले की, तरुणांनी आपापला परिसर तर स्वच्छ ठेवावाच परंतु त्यांनी शारीरिक, मानसिक व वैचारिक प्रदूषणापासून कटाक्षाने दूर राहावे. या कार्यक्रमाची संकल्पना ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगरू मा.डॉ.इंद्र मणी यांची, तर संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांचे मार्गदर्शन यासाठी लाभले. हा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांच्या नेतृत्वात संपन्न झाला. यासाठी त्यांना डॉ.विजय भामरे, डॉ.संतोष कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.अनिलकुमार कांबळे, डॉ. सुनिता मगर, डॉ.ज्ञानेश्वर सुरडकर, श्रीमती मीना साठे यांचे सहकार्य लाभले. श्रमदानासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी, कर्मचारी, प्राध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले.