नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आल्यानंतर देशाची घटनात्मक रचना मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१४ पासूनच या दिशेने प्रयत्न सुरू झाले असून २०२६ मध्ये लोकशाहीचे जे काही अवशेष शिल्लक आहेत, तेही ३० नोव्हेंबरला संपुष्टात येऊ शकतात, असा गंभीर इशारा माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी दिला आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
१३१ वी घटनादुरुस्ती विधेयक ३० नोव्हेंबर रोजी मंजूर झाल्यास भारतातील घटनात्मक लोकशाहीसमोर मोठे संकट निर्माण होईल, असे मत सिब्बल यांनी व्यक्त केले. हा दिवस देशाच्या घटनात्मक लोकशाहीसाठी निर्णायक ठरू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. सिब्बल यांनी पुढे इशारा दिला की, घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास देश हळूहळू हुकूमशाही स्वरूपाच्या शासनव्यवस्थेकडे वाटचाल करू शकतो. भविष्यात संविधानात आणखी बदल करून कार्यकारी यंत्रणेच्या मनमानीनुसार निर्णय घेतले जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सिब्बल यांच्या मते, अशा परिस्थितीत संसदेचे महत्त्व कमी होईल आणि संसद केवळ नावापुरती संस्था उरेल. न्यायालयांमधील नियुक्त्याही सरकारच्या पसंतीनुसार केल्या जातील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
देशातील घटनात्मक संस्था आणि लोकशाही व्यवस्थेच्या भवितव्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. माझा हा अंदाज आहे. आजची तारीख लक्षात ठेवा असे आवाहनही सिब्बल यांनी केले. ३० नोव्हेंबर हा दिवस हिंदुस्थानातील घटनात्मक लोकशाहीसाठी निर्णायक ठरू शकतो, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, ३० नोव्हेंबरला संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होणार असून या विधेयकाबाबत केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, या अधिवेशनात नेमके कोणते विधेयक मांडले जाणार आहे? याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
काय आहे १३१ वी घटनादुरुस्ती विधेयक?
१३१ वी घटनादुरुस्ती विधेयक हे मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित आहे. या विधेयकाद्वारे लोकसभेची सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवणे आणि महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्याचा प्रस्ताव होता. यापूर्वी १७ एप्रिल २०२६ रोजी लोकसभेत आवश्यक दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने हे विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते. त्यावेळी विधेयकाच्या बाजूने २९८, तर विरोधात २३० मते पडली होती.
















