अमरावती : चेंगराचेंगरीच्या वादामुळे अभिनेता अल्लू अर्जुन सतत चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची तेलुगू सिने दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेशी तडजोड करणार नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला सुरेश बेबी, दामोधर, केएल नारायण, चिन्ना बाबू, बीव्हीएसएन प्रसाद, सुधाकर रेड्डी, चित्रपट दिग्दर्शक कोर्टला सिवा, अनिल रविपुडी, के राघवेंद्र राव, प्रशांत वर्मा, नागार्जुन, शिवा बालाजी आणि व्यंकटेश उपस्थित होते. विशेष म्हणजे कोंडा सुरेखा वादानंतर नागार्जुन मुख्यमंत्र्यांना भेटण्याची ही पहिलीच वेळ होती.
चित्रपटसृष्टीतील कलाकारांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीबद्दल बोलताना ते म्हणाले की, स्टार्सनीही त्यांच्या चाहत्यांना नियंत्रित करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. कायदेशीर व्यवस्थेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही असेही ते म्हणाले.
पुष्पा २ अभिनेता अल्लू अर्जुन विरुद्ध रेड्डी यांचे गेल्या काही दिवसापासून एकमेकांविरुद्ध वक्तव्य समोर येत आहेत. पीडितेच्या कुटुंबाचा अधिक विचार करायला हवा, असे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितले आहे. रेड्डी यांनी असेही म्हटले आहे की अभिनेत्याने पोलिसांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दु:खद घटना घडली.
पुष्पा हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान पोहोचला. यावेळी त्याला पाहून चाहत्यांचे नियंत्रण सुटले आणि प्रत्येकजण त्याची एक झलक पाहण्याचा प्रयत्न करत होता. चेंगराचेंगरीमुळे रेवती नावाच्या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अल्लू अर्जुनला १३ डिसेंबरला अटक केली. त्याला कनिष्ठ न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाने या अभिनेत्याला दिलासा देत जामीन मंजूर केला.