हिंगोली : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध आहे. खरे तर मराठा समाजाला आरक्षण नाही, असे सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात मराठा समाजालाच आरक्षणाचा सर्वाधिक फायदा झाला आहे. मोदींनी दिलेल्या १० टक्के आरक्षणात ८५ टक्के जागा या मराठा समाजाला मिळाल्या आहेत. तसेच सारथीच्या माध्यमातूनही मराठा समाजाला भरपूर लाभ झाला आहे. त्यामुळे ओबीसींनाही सारथीप्रमाणेच लाभ दिला पाहिजे, असे राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्राचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या शिंदे समिती रद्द करून कुणबी नोंदींना स्थगिती द्या, असेही भुजबळ म्हणाले.
हिंगोली येथे आयोजित ओबीसी एल्गार महासभेत ते बोलत होते. इतरांना दिलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा हा मराठा समाजाला झाला आहे. मोदी सरकारने दहा टक्के आरक्षण दिले. पण त्यामध्ये ८५ टक्के जागा या मराठा समाजाला मिळाल्या. उरलेल्या ४० टक्के जागांमध्ये मराठा समाजाला जागा मिळाल्या. आमच्या २७ टक्के आरक्षणामध्येही मराठा समाज आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण नसतानाही सर्वाधिक फायदा मिळत आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या ६५० नियुक्त्यांपैकी ८५ टक्के नियुक्त्या या मराठा समाजाला मिळाल्या आहेत, असे छगन भुजबळानी सांगितले. केंद्रीय लोकसेवेच्या आयएएसमध्ये १५.५० टक्के तर आयपीएसमध्ये २८ टक्के मराठा समाजाचे लोक असल्याची आकडेवारीही भुजबळांनी मांडली.
आर्थिक मदतही मिळाली
मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ओबीसींपेक्षा जास्त फायदा झाल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मराठा समाजात गरीब आहेत, आमचा त्यांना विरोध नाही. पण अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून ७० हजार लाभार्थ्यांना ५१६० कोटी रुपये देण्यात आले. ओबीसींना अद्यापही तेवढे देण्यात आले नाहीत. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला १०,५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असेही भुजबळ म्हणाले.