29.4 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्रभिडेवाड्यात शाळा नाही, स्मारकाचा आराखडा तयार

भिडेवाड्यात शाळा नाही, स्मारकाचा आराखडा तयार

पुणे : प्रतिनिधी
महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्यादृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या स्मारकाच्या कामाचे भुमिपुजन जुलैमध्ये होणार आहे. या स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. या ठिकाणी शाळा होणार नाही. पण तेथे मुलीसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे करण्याचा बैठकीत घेण्यात आला. पहिल्या किंवा दुस-या मजल्यावर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था, वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग, कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याशिवाय वरील मजल्यावर मुली, महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री भुजबळ यांनी दिले.

स्मारकासाठीच्या सभोवतालच्या जागेच्या भूसंपादनासाठी राज्य शासन आणि महानगरपालिका दोन्ही यंत्रणा रक्कम देणार आहे. स्मारकाचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रसिद्ध करण्याच्यादृष्टीने गतीने काम करावे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. सन १९९२ साली पुणे शहरातील महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर राष्ट्राला अर्पण करून सदर वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR