मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री यांच्यात आरक्षणाच्या बाबतीत एकवाक्यता दिसत नाही. राज्याचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचे व जाती- जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या केले जात आहे.
मंत्री मंडळात जे एकत्र बसतात त्यांनी एकमुखाने भूमिका मांडली पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही असा आरोप शरद पवार गटाचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
जयंत पाटील म्हणाले की, मंत्री मंडळातील मंत्री आतमध्ये बसून भूमिका मांडण्यास कमी पडत आहेत म्हणून त्यांना बाहेर येऊन आपली भूमिका मांडावी लागत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. म्हणजे हे सर्व ठरवून सुरु आहे की काय? असा प्रश्न निर्माण होतो. ओबीसींच्या बाबतीत व मराठ्यांच्या बाबतीत सरकारची काय भूमिका आहे हे मुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने स्पष्ट केले पाहिजे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली आहे. त्यावर सरकारने योग्य ती पाऊले उचलणे गरजेचे आहे. राज्यात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत असे त्यांनी म्हटले.
राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विम्याच्या बाबतीत सरकारने अनेक घोषणा केल्या. पण मदत मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. ही शेतक-यांची थट्टा आहे. विदर्भात तुरीच्या पिकांचे, नंदुरबारमध्ये मिरचीचे तर जळगाव व नाशिकमध्ये द्राक्ष व कांद्याचे नुकसान झाले आहे. तसेच, या अवकाळी पावसामुळे जनावरांचेदेखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार
शेतक-यांच्या मागण्या व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा व ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी जळगाव, शुक्रवारी १ डिसेंबर रोजी नाशिकच्या दिंडोरी येथे तर ५ डिसेंबर रोजी अमरावती येथे हा मोर्चा निघेल व राज्य स्तरावरील पक्षाचे महत्वाचे नेते त्यात सहभागी होतील असे जयंत पाटील यांनी माहिती दिली.