34.7 C
Latur
Saturday, June 1, 2024
Homeमहाराष्ट्रमावळमध्ये शिवसेनेच्या दोन गटांत रंगली लढत

मावळमध्ये शिवसेनेच्या दोन गटांत रंगली लढत

श्रीरंग बारणे-संजोग वाघेरे यांच्यात सामना

उरण : प्रतिनिधी
मावळमध्ये शिवसेनेच्या दोन गटांत रंगली लढत मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत रंगली आहे. बारणे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी महायुतीने तर वाघेरेसारख्या नव्या चेह-याला मैदानात उतरवून ठाकरे गटाने बळ लावले आहे. त्यामुळे मावळमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत घटक पक्षांचे आमदार, महापालिका, नगरपरिषदांवर सत्ता राहिल्याने सुरुवातीला महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सोपी वाटणारी निवडणूक आता आव्हानात्मक बनल्याचे चित्र आहे. घटक पक्षांच्या नेत्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीतील खास पथक मावळात आल्याने महायुतीत संशयाचे धुके निर्माण झाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला सहानुभूती असल्याचे काही ठिकाणी जाणवते. मात्र, त्यासाठी महाविकास आघाडीचे नेते म्हणावे तसे प्रयत्न करीत असताना दिसत नाही.

पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शहरी, निमशहरी, ग्रामीण भाग येतो. पहिल्यांदाच शिवसेनेसमोर राष्ट्रवादीचे ’घड्याळ’ नसून उद्धव ठाकरेंची ’मशाल’ आहे. दोन्ही उमेदवार पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक आहेत. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीमधील घटक पक्षांचे आमदार आहेत. पिंपरी-चिंचवड, पनवेल या महापालिकांसह लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर भाजपची सत्ता होती तर वडगाव, देहूगावमधील नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता राहिली. कागदावर महायुतीची ताकद असल्याने सुरुवातीला महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी निवडणूक सोपी दिसत होती. परंतु महायुतीसोबत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय संजोग वाघेरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिल्याने निवडणुकीत रंगत आली. वाघेरेंनी पिंपरी-चिंचवड, मावळमध्ये नात्यागोत्यांचा आधार, जुन्या पक्षातील सहका-यांची मदत घेत प्रचार सुरू केला.

विरोधी उमेदवार कोण आहे, हे माहिती नसल्याचे विधान केल्याने राजकारण होण्याची चिन्हे दिसताच बारणेंनी सारवासारव केली. पण बारणे यांना अहंकार निर्माण झाल्याचा पलटवार वाघेरे यांनी केला. त्यानंतर बारणे यांनी वैयक्तिक बोलणे टाळून समोरच्या उमेदवाराने विकासकामांवर बोलावे, तसेच विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नसल्याचे सांगण्यावर भर दिला. मावळ लोकसभा मतदारसंघात दोन कार्यकाळ म्हणजे दहा वर्षे श्रीरंगअप्पा बारणे खासदार आहेत. या दहा वर्षात त्यांनी सहयोगी पक्ष म्हणजे भाजप यांच्या स्थानिक नेत्या, कार्यकर्त्यांना कधीही आपल्या जवळ येऊ दिले नाही. त्यांनी शिवसेनेला देखील आपल्या पासून लांब ठेवले, अशी मतदारसंघात चर्चा आहे. तसेच भाजपचे नेते, पदाधिकारीही नाराज आहेत. दरम्यान, महायुतीमधील पदाधिका-यांच्या कामावर बारकाईने नजर ठेवण्यासाठी दिल्लीतील सहा जणांचे पथक मावळात दाखल झाले. या पथकामुळे महायुतीत संशयाचे धुके निर्माण झाले आहे.

घाटाखालच्या भागात बारणे
यांची प्रचारात आघाडी
पनवेल, चिंचवड भागातील लोक भाजप पर्यायाने महायुती सोबत असल्याचे दिसतात. खासदारांचा अधिक संबंध येत नाही, त्यामुळे आमदार सांगतील त्यानुसार आम्ही मतदान करू, असे पनवेल, उरणमधील लोकांकडून सांगितले जाते. पनवलेमध्ये आमदार प्रशांत ठाकूर, उरणमध्ये महेश बालदी आणि कर्जतमध्ये महेंद्र थोरवे हे महायुतीच्या प्रचारात सक्रिय आहेत. दुसरीकडे उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्यावर वाघेरे यांची भिस्त आहे. पनवेल, कर्जतमध्ये मोठा चेहरा ठाकरे गटाकडे दिसत नाही. घाटाखालील या भागात बारणे यांची प्रचारात आघाडी दिसून येते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR