नवी दिल्ली : राजस्थान विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी ५८ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत अनेक आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यापूर्वी भाजपने पहिल्या यादीत ४१ तर दुसऱ्या यादीत ८३ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. भाजपने विधानसभेच्या २०० पैकी १२४ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तिसऱ्या यादीतील नावांचा समावेश केला तर विधानसभेच्या एकूण १८२ जागांसाठी भाजपने नावे जाहीर केली आहेत. तसेच तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ३५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
नुकतेच काँग्रेससोडून भाजपात आलेले पायलट समर्थक सुभाष मील यांना तिकीट देण्यात आले आहे. सुभाष मील यांना खंडेला मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या विरोधात आघाडी उघडल्यानंतर भाजपमधून निलंबित करण्यात आलेले विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलाश मेघवाल यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी नवोदित लालाराम बैरवा यांना शाहपुरातून तिकीट देण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा बालेकिल्ला असलेल्या सरदारपुरा येथून भाजपने महेंद्रसिंग राठौर यांना तिकीट दिले तर सचिन पायलट यांच्यासमोर टोंकचे माजी आमदार अजित मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे.