28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeसोलापूरयंदा ६ मे ते १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुटी

यंदा ६ मे ते १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुटी

सोलापूर : ६ मे ते १४ जूनपर्यंत यंदा शाळांना तथा शिक्षकांना उन्हाळी सुटी असणार आहे. १५ जूनपासून पुन्हा नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे.शालेय शिक्षण विभागाकडील वार्षिक कॅलेंडरनुसार एका शैक्षणिक वर्षात शिक्षकांना ७६ सार्वजनिक सुट्या असतात. याशिवाय ५२ रविवारच्या देखील सुट्या मिळतात.

सार्वजनिक सुट्यांमध्ये आषाढी एकदाशी, बकरी ईद, मोहरम, स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्ष, नागपंचमी, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, गौरी पूजन, ईद ए मिलाद, अनंत चतुर्दशी, गांधी जयंती, घटस्थापना, दसरा आणि दिवाळीच्या १४ सुट्या, गुरुनानक जयंती, ख्रिसमस- नाताळ, मकरसंक्रांती, प्रजासत्ताक दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री, धुलिवंदन, गुडफ्रायडे, रंगपंचमी, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती, महाराष्ट्र दिन याशिवाय ३५ दिवस उन्हाळी सुटी, वेळ आमवस्या, मुख्याध्यापक अधिकारात एक सुटी आणि गावच्या यात्रेची एक दिवसाची सुटीचा समावेश आहे.

दरम्यान, यंदा लोकसभेची निवडणूक होत असल्याने शिक्षकांना ७ मे रोजी देखील निवडणुकीच्या कामासाठी यावे लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या नवीन आदेशानुसार पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना आता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यांची परीक्षा नुकतीच पार पडली, १ मे रोजी निकाल देखील जाहीर झाला. त्यात अनुत्तीर्ण झालेल्या पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची १५ जूनपूर्वी फेरपरीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्याचे आदेश संबंधित विषय शिक्षकांना देण्यात आले आहेत. त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे. दरम्यान, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संबंधित विषयाचे ज्यादा तास घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणावे लागणार आहे. त्यासाठी उन्हाळा सुटीत शिक्षकांना दररोज शाळेत येण्याचे बंधन नाही, ते आठवड्यातून एकदा येऊनही अध्यापन करू शकतात. दुसरीकडे सोशल मीडियाच्या मदतीने ते विद्यार्थी व पालकांशी संपर्क साधूनही मार्गदर्शन करू शकतात, असे प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

सुरूवातीला बारावीचा निकाल जाहीर होणार असून तो ३१ मेपूर्वी आणि त्यानंतर इयत्ता दहावीचा निकाल ५ जूनपूर्वी जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या असून आता दहावीच्या दहा टक्के उत्तरपत्रिका तपासायच्या शिल्लक आहेत. निकालानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची लगेचच जुलैमध्ये पुरवणी परीक्षा होऊन काही दिवसांत त्यांचा निकाल जाहीर होईल. जेणेकरून त्यांनाही २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पुढील वर्गात प्रवेश घेऊन शिकण्याची संधी मिळेल हा हेतू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR