37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeधाराशिवताई.. बाई.. अक्का, विचार करा पक्का....

ताई.. बाई.. अक्का, विचार करा पक्का….

कळंब : सतीश टोणगे

ताई.. बाई.. अक्का…..असा ओरडत येणारा भोंगा मंदिराजवळ थांबत असे, त्या वेळी ब्लॅक अँड व्हाईट असणारे उमेदवारांचे जाहीरनामे दिले जायचे….किती मजा असायची…पण आता…बदलत्या काळानुसार सर्वच क्षेत्रांत बदल होताना दिसत आहेत. कोणत्याही लहान-मोठ्या निवडणुकीत घराच्या भिंती रंगवल्या जायच्या.

भिंतीवर पोस्टर चिकटवले जायचे, पेंटरकडून बॅनर रंगवून घेतले जायचे. या सगळ्यांना काम मिळायचे. पण सध्या डिजिटल युगात पेंटर, फोटोग्राफर, पोस्टर लावण्यासाठी लागणा-या साहित्याची विक्री करणारे इतिहासजमा झाले आहेत.निवडणूक लागली की, ‘ताई.. बाई.. अक्का… विचार करा पक्का’ असे वाक्य कानी पडायचे. आता मात्र संगीतमय तयार केलेली कॅसेट लावली जाते व प्रोजेक्टरवर माहिती लावली जाते.

पूर्वी प्रचार सभेत पातळी सोडून कधी टीका होत नव्हती, विकास कामांवर चर्चा व्हायची, आता मात्र सभेत गोंधळ घातला जात आहे आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, लोकशाहीचे दर्शन होऊ लागले आहे. विकासाचा मुद्दा न आणता एकमेकाची उणी-दुणी काढून मतदारांची दिशाभूल केली जात आहे.

सोशल मीडियावर ‘कार्टून वॉर’ सुरू झाले आहे. एकमेकांना ट्रोल करण्याची संधी कार्यकर्ते सोडत नाहीत. मतपत्रिकेवर मतदान करताना वेगळीच मजा होती, आता मतदान मशिन ही संशयाच्या भोव-यात सापडली आहे, त्यामुळे मतदारांत आनंदाचे वातावरण नाही. ‘ताई.. बाई..अक्का…विचार करा पक्का आणि …..यावर मारा शिक्का’ असे ओरडल्याशिवाय निवडणुका आल्यासारख्या वाटत नसल्याची कुजबूज होताना दिसत आहे. असो. बदल तर होणे अपेक्षित असते पण हा बदल संशयाच्या भोव-यात अडकवू नये म्हणजे झालं. इलेक्शनमधील पूर्वीचे किस्से, मजा आता इतिहासजमा झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR