जालना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडिया वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात अभिमन्यू खोतकर यांनी केलेल्या तक्रारीवरून जालना तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार वेगवेगळे इन्स्टाग्राम अकाउंट वापरुन आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांच्याविरुद्ध अश्लील शिवीगाळ करत त्यांना गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे जालना जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी जालना तालुका पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटची सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच या अज्ञात व्यक्तीचा शोध देखील पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली आहे. आमदार आणि त्यांच्या पुत्राला थेट धमकी देण्यात येत असल्यामुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे.