26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; हत्येचा संशय

पालघरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; हत्येचा संशय

पालघर : प्रतिनिधी
वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच घरातील तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली. आई व तिच्या मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला. जवळपास १२ दिवसांपासून संपर्काच्या बाहेर असलेल्या या कुटुंबाचे अशा पद्धतीने मृतदेह आढळल्याने ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुकुंद बेचरदास राठोड (७५), कंचन मुकुंद राठोड (६२) व मुलगी संगीता मुकुंद राठोड (५२) अशी त्यांची नावे आहेत.

मूळचे गुजरात येथील असलेले हे कुटुंब नेहरोली या गावात वीस वर्षांपासून राहत होते. १८ ऑगस्टपासून हे कुटुंब संपर्काच्या बाहेर असल्याने राजकोट येथे फेब्रिकेशन व्यवसाय करीत असलेला त्यांचा मुलगा सुहास शोध घेण्यासाठी नेहरोली येथे आला. नेहरोली येथील घराला बाहेरून कुलूप असल्याने कुटुंब आजारी तर नाही ना या आशेने आजूबाजूचे सर्व दवाखाने तपासून पाहिले.

आपल्य कुटुंबाचा कुठेही शोध लागला नसल्याने अखेर घरातील काही कागदपत्रे काढण्याच्या उद्देशाने कुलूप फोडले व यावेळी घरातील दृश्य बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आई व मुलीचा मृतदेह एका बंद पेटीमध्ये आढळून आला तर वडिलांचा मृतदेह बाथरूममध्ये पडलेला दिसला.
नेहरोली येथील राठोड कुटुंब ज्या दिवसापासून संपर्काच्या बाहेर होते, अगदी तेव्हापासूनच मुकुंद यांचे भाडेकरू कुटुंब गावी गेल्याचे सुहास यांनी सांगितले. या भाडेकरू कुटुंबाची चौकशी केल्यानंतर या घटनेबाबत काही धागेदोरे बाहेर येण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR