23.9 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeलातूरमनोज जरांगे यांच्या ‘यु टर्न’ची तीन कारणे!

मनोज जरांगे यांच्या ‘यु टर्न’ची तीन कारणे!

लातूर : निवडणूक डेस्क
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र २४ तास उलटण्यापूर्वी त्यांनी मोठी ‘यु-टर्न’ घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली. आता निवडणूक लढणार नाही, पण उमेदवार पाडणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

ह्याला पाड त्याला पाड ही भूमिका आपली नाही. उमेदवार पाडण्याची माझी इच्छा नाही. मात्र भूमिकेशी सहमत नसलेल्या उमेदवारांना पाडणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. महाविकास आघाडी असो की, महायुती मी कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. यादीच नाही तर मी तरी काय करणार? मी माझी भूमिका बदलत नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले.

मुस्लिम, मागासवर्गिय जबाबदार
मनोज जरांगे पाटील यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजासोबत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी १४ मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार असल्याची घोषणा केली होती. तसेच आज सकाळी उमेदवारांची घोषणा करु असे त्यांनी म्हटले होते. पण त्यांनी सकाळी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजावर खापर फोडले.

एका जातीवर निवडून येणे कठीण
आमची मध्यरात्री ३ वाजेपर्यंत चर्चा सुरु होती. आम्ही १४ उमेदवार निश्चित केले होते. मात्र इतर समाजाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही यादी आलेली नाही. मित्रपक्षांनी उमेदवारांची नावे न पाठवल्याने उमेदवार घोषित केले नाही. आम्हाला एकाच जातीच्या आधारावर लढणे शक्य नाही. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत. एकाच जातीवर निवडणूक जिंकणे सोपे नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह शक्य
या आंदोलनाच्या मागचा बोलवता धनी कुणीतरी आहे. आता त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. अंतिम निष्कर्षापर्यंत आताच येता येणार नाही. मात्र पुन्हा पाडापाडी त्यांच्या मनात आले तर ते भूमिका बदलू शकतात. जर त्यांनी पाडापाडीचे धोरण अवलंबवले तर त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, याचीच शक्यता जास्त आहे.

कोणाला पाठिंबा नाही, आंदोलन सुरू राहणार
विधानसभा निवडणुकीतून आम्ही माघार घेतलेली नाही. हा गनिमी कावा आहे. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज मागे घ्यावेत. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, दोन्हीकडचे नेते सारखेच आहेत. त्यामुळे कोणाला पाठिंबा देणार नाही. तसेच कोणालाही निवडून आणा, असे देखील सांगणार नाही. आपण कुणाच्याही प्रचाराला, सभेला जायचे नाही, मतदान करायचे आणि मोकळे व्हायचे. मात्र केवळ माझे आंदोलन सुरु राहणार असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR