हदगाव -प्रतिनिधी
हिंगोली लोकसभा मतदारसंघात आता निवडणुकीच्या रिंगणात ३३ उमेदवार उभे आहेत. या उमेदवारांना निवडणूक विभागाकडून चिन्हेही वाटप झाली आहेत. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर- धनुष्यबाण, महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे नागेश पाटील आष्टीकर- चिन्ह मशाल तर वंचित बहुजन आघाडीचे बी. डी. चव्हाण- चिन्ह कपाट यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याचे आता चित्र स्पष्ट झाले आहे; परंतु येथे महायुतीतील बंडखोरी पहावयास मिळत आहे.
भाजप नेते शिवाजी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत त्यामुळे महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर यांनी शिंदेंच्या उमेदवाराची चिंता वाढवली आहे. तर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची डोकेदुखी ठरणार आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचाराचा नारळ आजपासून फोडला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली, वसमत, कळमनुरी, उमरखेड, हदगाव, किनवट विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे तर एकूण १८ लाख १७ हजार ९३४ मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात बंजारा समाजसुध्दा मोठ्या प्रमाणात आहे
. गेल्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांनी १ लाख ७४ हजार मते घेतली होती. याचा फटका महाविकास आघाडीला बसला होता. आता सुद्धा यावर्षी वंचित बहुजन आघाडीकडून बंजारा समाजाचे बी. डी. चव्हाण पुन्हा एकदा मैदानात आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची डोकेदुखी वाढली आहे. तर भाजपच्या बंडखोराने महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर यांची चिंता वाढवली आहे. एकंदरीत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी, महायुती अधिक वंचित बहुजन आघाडी अशी तिहेरी लढत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.