मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. मराठी अभिनेत्रीही आपल्या फिटनेससाठी योगाभ्यास करताना दिसून येतात. तू अनोळखी तरी सोबती या मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाणने योगाविषयी तिचे मत शेअर केले आहे.
योगिता चव्हाण म्हणाली की एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला फिट ठेवणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कलाकारांचे कामाचे वेळापत्रक खूप धावपळीचं आणि अनियमित असते. सततचे शूटिंग, प्रवास आणि त्यामध्ये स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे हे एक मोठे आव्हान असते. पूर्वी मी जिमवर जास्त भर द्यायचे, पण आता मला योगाचे खरे महत्त्व समजले आहे. माझ्या दिवसाची सुरुवात मलासनमधे बसून गरम पाणी पिणे, प्राणायाम आणि काही सोप्या योगासनांनी होते. यामुळे खूप फ्रेश वाटते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
योग हा फक्त व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारा एक सुंदर मार्ग आहे. मला थायरॉईडचा त्रास आहे आणि नियमित योगामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत होत आहे. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, ताण कमी होतो आणि आत्मविश्वासही वाढतो. पुढे ती म्हणाली की आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वत:साठी वेळ काढणे विसरून जातो, पण दिवसातील काही मिनिटे योगासाठी दिली तर त्याचा फायदा संपूर्ण दिवसभर जाणवतो.
















