बंगळूरू : लैंगिक शोषणाचे आरोप असलेला माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा याचे जेडीएसमधून निलंबन करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून भारताबाहेर असलेला प्रज्ज्वल रेवण्णा अखेर समोर आलाय. त्याने ट्वीटरवर एक व्हीडीओ पोस्ट केले आहे. मी लवकरच भारतात परतणार असून ३१ मे रोजी एसआयटी चौकशीला सामोरे जाणार आहे, असे रेवण्णा म्हणाला आहे. दरम्यान, रेवण्णाच्या भारतात परतण्याच्या माहितीवर जेडीएसकडून अद्याप कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. शिवाय रेवण्णाच्या कुटुंबियांनी देखील याबाबत भाष्य केलेले नाही.
आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणाला, जेव्हा २६ एप्रिलला निवडणुका पार पडल्या त्यावेळी माझ्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल नव्हती. कोणतीही एसआयटी नेमण्यात आली नव्हती. माझी विदेश यात्रा पूर्वनियोजित होती. माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत मला विदेशात माहिती मिळाली. राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी माझ्याविरोधात बोलण्यास सुरुवात केल होती. माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आले आहे. शुक्रवारी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता मी एसआयटीसमोर हजर होणार आहे. मी माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत संपूर्ण माहिती देणार आहे. मी चौकशीचे समर्थन करणार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.
प्रज्ज्वल रेवण्णाचा व्हीडीओ संवाद
प्रज्ज्वल रेवण्णा पोस्ट केलेल्या व्हीडीओमध्ये म्हणाला, सर्वांना नमस्कार, सर्वांत प्रथम माझे वडिल, माझे आजोबा आणि माझे कुमार अण्णा, आणि देशातील जनतेचे आणि जेडीएसच्या सर्व कार्यकर्त्यांची मी माफी मागतो. मी सध्या विदेशात आहे. मला योग्य माहिती देण्यात आली नाही. मी येथे २६ तारखेला निवडणूक झाल्यानंतर सर्वांना माहिती देण्यासाठी आलो आहे.