16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडकंधार-लोहा मतदारसंघात चुरशीची लढत

कंधार-लोहा मतदारसंघात चुरशीची लढत

कंधार : प्रतिनिधी
कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रताप पाटील चिखलीकर, शेकापचे आशाताई शामसुंदर शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनाथ पवार, आरक्षणवादी आघाडीचे चंद्रसेन सुरनर व मनोहर धोंडेसह एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. महायुती, महाविकास आघाडी व ओबीसी आघाडी यामध्ये जोरदार लढत आहे. कंधार लोहा विधानसभा मतदार संघात मोठी चुरशीची लढत होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या मतदारसंघात मागील निवडणुकीच्या उलट परिस्थिती निर्माण झाली असून मात्र खरी लढत प्रताप पाटील चिखलीकर आणि आशाताई शिंदे या बहिण भावासह एकनाथ पवार यांच्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ओबीसी नेते चंद्रसेन पाटील सुरनर, मनोहर धोंडे, शिवा नरंगले या तीन उमेदवारांमुळे ओबीसी समाजातील मतदाराचे विभाजन होईल, असेही बोलले जात आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये एकनाथ पवार यांनी भाजपला राम-राम ठोकत शिवबंधन बांधले आणि लोहा विधानसभा मतदारसंघात प्रताप चिखलीकर यांच्याविरोधात एकनाथ पवार यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा दांडगा जनसंपर्क कोणावर भारी पडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

विद्यमान आमदार शामसुंदर शिंदे व त्यांच्या पत्नी आशाताई शिंदे हे दोघेही पती-पत्नी मतदार संघात सदैव कार्यरत असल्याने यांना सर्वच स्तरातील मतदार ओळखतात. त्यांच्या मागील कामांचा आढावा घेताना लोकं दिसत आहेत. कंधार-लोहा विधानसभा मतदार संघात आमदार शिंदे यांनी मागील पंचवार्षिकमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे आणली. त्यामुळे त्यांच्या कामाची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे लोहा मतदारसंघ शेकापचा गड राहिला असून मतदारांचा कल स्थानिक उमेदवाराकडे दिसून येत आहे. भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लोहा विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधून घ्यावे लागले. साडेतीन दशकांच्या राजकीय जीवनातील चिखलीकर यांचे हे सहावे पक्षांतर आहे.

चिखलीकर यांनी लोहा कंधार विधानसभा मतदार संघातून दोन वेळेस प्रतिनिधित्व केले. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कंधार लोहा विधानसभेची वाट धरली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR