इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पूर्व भागात विषारी धुक्याचा कहर पाहायला मिळत आहे. धुक्यामुळे हजारो लोक आजारी पडत असून प्रशासनाने या आठवड्यात लाहौरसह तीन शहरांमध्ये बंदच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर लाहौरमधील प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे.
पंजाबच्या प्रांतिक सरकारने लाहोरसह तीन शहरांतील शाळा, कार्यालये, मॉल आणि उद्याने रविवारपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लाहौरचा हवेचा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) ४०० च्या आसपास राहिला आहे, जो ‘गंभीर’ श्रेणीत मानला जातो. सीमेपलीकडील भारतातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे. भारताची राजधानी दिल्लीतही एक्यूआय ४०० च्या वर राहिला, त्यात शुक्रवारी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.
पाकमध्ये विषारी वातावरण आता सामान्य झाले आहे आणि त्याचा आरोग्य आणि दैनंदिन व्यवसायावर परिणाम होत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, असे दिसते की विषारी वातावरण आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहे. लाहौरमधील आणखी एक रहिवासी सारा जीशानने माध्यमांना सांगितले की, तिची दीड वर्षांची मुलगी काही गिळू शकत नाही कारण प्रदूषणामुळे तिच्या तोंडात अल्सर झाले आहेत.