चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली. बिहारमधील एका स्थलांतरित कामगारासह त्याची पत्नी आणि दोन वर्षांच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यास विरोध केल्यामुळे आरोपींनी संपूर्ण कुटुंबाचा काटा काढला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली.
मृतक कुटुंब बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होते. २४ वर्षीय तरुण श्रीपेरंबुदूर येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि आपल्या कुटुंबासह चेन्नईच्या तारामणी भागात राहत होता. २५ जानेवारीच्या रात्री आरोपींनी त्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पतीने याला जोरदार विरोध केला असता, नराधम आरोपींनी लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची हत्या केली. पतीच्या हत्येनंतर आरोपींनी महिलेचीही हत्या केली. धक्कादायक म्हणजे, या गुन्ह्याचा कोणताही साक्षीदार उरू नये आणि आपण पकडले जाऊ नये, या भीतीने आरोपींनी अवघ्या दोन वर्षांच्या निष्पाप मुलालाही ठार केले.
२६ जानेवारी अड्यार भागात रस्त्याच्या कडेला एका पोत्यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या माहितीनुसार, पोलिसांनी बकिंगहॅम कालव्यातून दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला. आरोपींनी महिलेचा मृतदेह इंदिरा नगर रेल्वे स्टेशनजवळील कच-याच्या डब्यात फेकल्याचे सांगितले आहे. सध्या पोलिस आणि महानगरपालिका पथक महिलेच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

