वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादलेले शुल्क कमी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी कबूल केले की सध्याचे टॅरिफ दर इतके जास्त आहेत की जगातील २ सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांनी एकमेकांशी व्यापार करणे थांबवले आहे.
ट्रम्प यांनी एनबीसीच्या एका कार्यक्रमात म्हटले होते की, मी कधीही चीनवरील कर कमी करेन, कारण जर असे केले नाही तर त्यांच्यासोबत व्यवसाय करणे शक्य होणार नाही आणि त्यांना व्यवसाय करायचा आहे. ट्रम्प यांनी सूचित केले की चीनची अर्थव्यवस्था सध्या अडचणीत आहे. २०२३ नंतर तेथील कारखान्यांचे कामकाज सर्वात वाईट स्थितीत आहे. निर्यात ऑर्डरमध्येही लक्षणीय घट झाली आहे. त्यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणांतर्गत, ट्रम्प यांनी अमेरिकेला वस्तू विकणा-या सर्व देशांवर १०% कर लादला. परंतु, २० एप्रिल रोजी चीनवरील कर १४५% पर्यंत वाढवण्यात आला. प्रत्युत्तरादाखल, चीननेही अमेरिकन वस्तूंवर १२५% पर्यंतचे शुल्क लादले.
चर्चेसाठी पुढाकार घेणार नाही : ट्रम्प
रविवारी एका मुलाखतीत ट्रम्प यांनी कबूल केले की टॅरिफचा चीनवर परिणाम झाला आहे, कारखाने बंद पडत आहेत आणि बेरोजगारी लक्षणीयरीत्या वाढली आहे. पण त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ते चर्चा सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार नाहीत. अँकर क्रिस्टन वेल्कर यांनी विचारले, चीनशी चर्चा सुरू करण्यासाठी तुम्ही शुल्क काढून टाकणार आहात का? यावर ट्रम्प यांनी उत्तर दिले, मी हे का करावे? ट्रम्प म्हणाले की, अलिकडेच बीजिंगकडून काही चांगले संकेत मिळाले आहेत, परंतु त्यांनी पुन्हा सांगितले की अमेरिका आणि चीनमधील कोणताही करार समान अटींवर असेल तरच होईल.
चीननेही चर्चेची तयारी दर्शवली
शुक्रवारी चीनने पहिल्यांदाच अमेरिकेशी चर्चेसाठी तयार असल्याचे संकेत दिले. ते अमेरिकेसोबत व्यापार कराराची शक्यता शोधत आहेत. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, चीन अमेरिकेच्या व्यापार चर्चेच्या ऑफरवर विचार करत आहे, परंतु ट्रम्प यांनी एकतर्फी लादलेले शुल्क मागे घेतले तरच वाटाघाटी सुरू होतील.
दोघांनाही होतेय नुकसान
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार युद्धामुळे आर्थिक बाजारपेठेत गोंधळ उडाला आहे आणि त्यामुळे उत्पादन उपकरणे तसेच कपडे आणि खेळणी यासारख्या स्वस्त वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्यावर अनेक अमेरिकन लोक अवलंबून आहेत. त्याच वेळी, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, २०२३ नंतर चिनी कारखान्यांमधील काम सर्वात वाईट स्थितीत आहे. निर्यात ऑर्डरमध्येही लक्षणीय घट झाली आहे. डिसेंबर २०२२ नंतरची ही सर्वाधिक घट आहे. शेवटची वेळ एप्रिल २०२२ मध्ये घडली होती, जेव्हा शांघाय पूर्णपणे लॉकडाऊनमध्ये गेला होता.
नवीन विमाने घेण्यास चीनचा नकार
गेल्या महिन्यात, चीनने आपल्या विमान कंपन्यांना अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगकडून नवीन विमानांची डिलिव्हरी घेऊ नये असे आदेश दिले होते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, बीजिंगने अमेरिकेत बनवलेल्या विमानांचे भाग आणि उपकरणांची खरेदी थांबवण्याचे आदेशही दिले आहेत.