कराची : पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे तुर्कीचे नौदल जहाज टीसीजी बुयुकाडा रविवारी कराची बंदरामध्ये दाखल झाले आहे, तुर्की नौदलाचे जहाज सद्भावना म्हणून काराचीमध्ये आल्याचे स्पष्टीकरण यावर पाकिस्तानच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या चांगल्याच आवळल्या आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत माहिती देताना पाकिस्तानच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले की, तुर्कीचे नौदल जहाज टीसीजी बुयुकादा कराची बंदरात पोहोचले आहे. कराचीमध्ये तुर्कीच्या नौदलाचं जंगी स्वागत करण्यात आले. तुर्की नौदल आणि पाकिस्तानी नौदलामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये युद्ध प्रशिक्षण, मदत, परस्पर सहकार्य अशा विविध विषयांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत माहिती देताना पाकिस्तानी सेनेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, तुर्की नौदलाचे जहान पाकिस्तानमध्ये आले आहे. हे एक चांगले संबंध, बंधूभाव आणि पक्की मैत्री यांचे एक चांगले उदाहरण आहे. तुर्की नौदल आणि पाकिस्तानी नौदल यांच्यामध्ये यादरम्यान विविध विषयांवर चर्चा होईल. दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत करण्याची ही एक संधी आहे.
पाकिस्तानचा जळफळाट
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधू नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. आयात-निर्यात बंद करण्यात आली आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत, त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला असून, त्यांच्या नेत्यांकडून सातत्याने युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.