नांदेड : प्रतिनीधी
लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेटसांगवीच्या शिवारात विहीरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर अन्य एकजण बचावला आहे. सदर घटना रविवारी सकाळी ११:३० वाजता घडली.
लोहा तालुक्यातील बेटसांगवी येथील विनायक आत्माराम वानखेडे यांच्या शेतातील विहीरीमध्ये रविवारी सकाळी तिघेजण गेले होते. त्यापैकी संतोष सखाराम वानखेडे वय १८ वर्ष, रा. बेटसांगवी व राजेश गणेश वानखेडे वय १७ वर्षे रा. बेटसांगवी या दोघांनी विहीरिमध्ये पोहण्यासाठी उडी मारली. मात्र अचानक त्यांना ते बेशुध्द झाल्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. अन्य एकजण मात्र पाण्यात उतरला नसल्यामुळे वाचला आहे.
सदरील घटनेनंतर बेटसांगवी येथील कांही नागरिकांनी पाण्यामध्ये विजपुरवठा उतरल्यामुळे शॉक लागून सदर युवकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र सोनखेड पोलिस ठाण्यामध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली होती. मयतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. सदर घटनेबाबत सोनखेडे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.