काठमांडू : नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट परिसरातील फेरिचे हेलिपॅडवर मंगळवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. लँडिंग करत असताना दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याने झालेल्या या दुर्घटनेत एका भारतीय नागरिकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. नेपाळ पोलिसांच्या प्राथमिक अहवालानुसार, सकाळी सुमारे ८ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास फिशटेल एअर आणि डायनेस्टी एअरच्या हेलिकॉप्टरमध्ये ही टक्कर झाली.
पोलिस निरीक्षक मौसम तामांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत पावलेल्या हिंदुस्थानी नागरिकाची ओळख वसंत कुमार बलरामरामाडू अशी पटली आहे. ते फिशटेल एअरच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. याच हेलिकॉप्टरमध्ये असलेले हिंदुस्थानी वंशाचे न्यूझीलंडचे नागरिक शैलेश कृष्ण पटेल हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ प्रभू हेलिकॉप्टरच्या मदतीने काठमांडूच्या मेडिसिटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तसेच दोन्ही हेलिकॉप्टरचे वैमानिक फिशटेल एअरचे कॅप्टन प्रज्ज्वल केसी आणि एअर डायनॅस्टीचे कॅप्टन रवींद्र प्रजापती यांनाही या दुर्घटनेत दुखापत झाली असून पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांनाही काठमांडूला नेण्यात आले आहे.
घटना घडली त्यावेळी दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये नेमके किती प्रवासी होते, याबाबतची एकूण संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी या घटनेबाबतची अधिक माहिती गोळा करत आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच सिमरिक एअरचे हेलिकॉप्टर तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
















