औसा : प्रतिनिधी
औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील बेलकुंड येथे गुरुवार दि. ३ एप्रिलच्या रात्री नादुरुस्त अवस्थेत असलेल्या ट्रकला मागून आयशर टेम्पो धडकला तर आयशर टेम्पो मागून येणारी कार आयशर टेम्पोला धडकून झालेल्या भीषण अपघातात आयशर टेम्पो चालक व नादुरूस्त ट्रक दुरूस्ती करणारा मेकानिकचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड जवळ गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास (एमएच २६ -७२१२ ) क्रमांकाचा ट्रक नादुरूस्त अवस्थेत उभा होता. हा ट्रक दुरूस्त करण्याचे काम एक मेकानिक ट्रक खाली करीत असताना औसा वरून पुणे येथे कोंथिबीर घेऊन निघालेल्या (एमएच २५ पी ३७३७) आयशर टेम्पोच्या चालकाला सुरू असलेल्या पावसामुळे नादुुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या ट्रकचा अंदाज न लागल्याने तो ट्रकला मागून धडकल्याने या भीषण अपघातात आयशर टेम्पो चालक दत्ता सावंत (वय ४५ रा. आशीव) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर नादुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या ट्रकला मागून आयशर टेम्पो धडकल्याने ट्रकच्या खाली ट्रक दुरूस्ती करीत असलेल्या मेकॅनिकलच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला मयत मेकॅनिकची ओळख रात्री उशिरापर्यंत होऊ शकली नाही. तर या अपघातात ट्रकला आयशर टेम्पो धडकल्याने मागून येणारी कार( एम एच ०२ डिजे २२८८) कार आयशर टेम्पोला मागून धडकल्याने या कारचेही मोठे नुकसान या अपघातात झाले आहे मात्र सुदैवाने कारमध्ये असलेल्या दोघांना इजा झाली नाही.
महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
भर पावसात हा भीषण अपघात झाल्याने राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी नागरिकांनी भर पावसात मदत कार्य केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी भादा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महावीर जाधव व बीट अंमलदार शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.