मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रभाव राजकीय वर्तुळातही दिसून येत आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत काही आमदार आणि खासदारांचे राजीनामा सत्र पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील ३ आमदार आणि दोन खासदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये शिंदे गटाचे २ खासदार, १ आमदार, काँग्रेसचा एक आमदार आणि भाजपच्या एका आमदाराचा समावेश आहे.
दरम्यान, राज्यात मराठा आंदोलन पेटले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठे एकत्र आले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले आहे. अशातच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
राज्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच, त्यांच्या गाड्याही फोडल्या.
वेळ पडल्यास राजीनामा देईन : सुहास कांदे
जोपर्यंत जरांगे पाटील यांचे उपोषण सुटत नाही आणि मराठा आरक्षणावर काही ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत कुठल्याही गावात जाणार नाही आणि कुठल्याही विकास कामांचे उद्घाटन करणार नाही. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे, असे वक्तव्य आमदार सुहास कांदे यांनी केले आहे. वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी मी माझा राजीनामा देईन, असेही कांदे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन : झिरवळ
मराठा आंदोलकांकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी राजीनामा देईन, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.