नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना बुधवारी रात्री भोपाळमध्ये अटक झाली. आठ वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणात त्यांना अटक झाली. अद्वय हिरे यांना अटक ही उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये कोंडी करण्यासाठी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
रेणुका सूतगिरणी प्रकरणात फसवणुकीच्या आरोपाखाली अद्वय हिरे यांना अटक झाली आहे. या गिरणीसाठी साडेसात कोटी कर्ज घेतले होते. हे कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अद्वय हिरे यांना अटक केल्यानंतर हिरे समर्थकांनी पोलिसांच्या गाडीसमोर गोंधळ घातला. यामुळे पोलिसांनी अद्वय हिरे यांना मालेगावच्या बाहेर नाशिकमध्ये पोलिस ठाण्यात रात्रभर ठेवले होते.
रेणुका सूतगिरणीसाठी साडेसात कोटींचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्यावर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता.
हिरेंनी मालेगावची विधानसभा लढू नये म्हणून दबाव : संजय राऊत
‘हसन मुश्रीफ यांनी संत संताजी घोरपडे कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप भाजपाने केला. मुश्रीफ सध्या जामिनावर सुटले आहेत. ईडी, सीबीआयची प्रकरणे असलेले शिवसेनेचे लोक सरकारमध्ये आहेत. या लोकांवर कुठलीही कारवाई होत नाही. पण, अद्वय हिरेंना अटक करून सरकारने दाखवून दिले की आम्ही सुडाचे आणि दबावाचे राजकारण करत आहोत. अद्वय हिरेंनी मालेगावची विधानसभा लढू नये, म्हणून दबाव होता. अद्वय हिरेंच्या पाठिशी संपूर्ण शिवसेना आहे,’ असे संजय राऊतांनी सांगितले.