29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयउज्ज्वला गॅस सिलिंडरवर सबसिडीत सूट मिळणार?

उज्ज्वला गॅस सिलिंडरवर सबसिडीत सूट मिळणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान उज्ज्वला योजना अंतर्गत केंद्र सरकार लाभार्थ्यांना आणखी दिलासा देण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांत एलपीजी गॅस सिलिंडरवर आणखी सूट मिळू शकते. पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सध्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात १२ एलपीजी गॅस सिलिंडरवर ३०० रुपये सबसिडी मिळते. येत्या काही महिन्यांत उज्ज्वला योजनेंतर्गत अतिरिक्त सवलती देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

केंद्र सरकार निवडणुकांच्या पुढे सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाकडून ई-मेलद्वारे माहिती मागविण्यात आली असता त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढलेल्या असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने ४ ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना १०० रुपये अनुदान मंजूर केले होते. त्याआधी सप्टेंबरमध्ये २०० रुपये सबसिडी मंजूर केली होती. सध्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी एका एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ६०३ रुपये मोजतात तर इतर ग्राहकांना एका एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ९०३ रुपये द्यावे लागतात. २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती.

सिलेंडरच्या विक्रीत वाढ
अलिकडे सरकारने दरात वाढ केल्याने एलपीजी गॅल सिलिंडरच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. उज्ज्वला गॅससाठी सबसिडी वाढविण्यात आली. त्यामुळे गॅस सिलिंडर स्वस्त दरात मिळत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात रोज रिफिल होणा-या एलपीजी सिलिंडरची सरासरी संख्या 11 लाखांच्या पुढे गेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR