मुंबई : प्रतिनिधी
आषाढीच्या निमित्ताने पालख्या पंढरपूरच्या जवळ पोहोचल्या आहेत. यामध्ये लाखो वारकरी सहभागी झाले असून, हरिनामाचा गजर करीत वारकरी पंढरीच्या दिशेने चालत आहेत. त्यातच आता या वारीत अर्बन नक्षलवादी शिरले आहेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे आहेत, असेही त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. आता कायंदे यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
देवाला धर्माला ही लोक मानत नाही, हा त्यांचा अधिकार आहे. हिंदू धर्म आणि वारीबद्दल अपप्रचार करत आहेत, लोकांचा बुद्धिभेद करत आहेत. पंढरपूरची वारी अशी आहे, जिथे कोणी कोणाला निमंत्रण देत नाही. वेगवेगळ््या बोगस नावाखाली काही संघटना जसे पर्यावरण दिंडी, संविधान दिंडीसारख्या गोष्टी समोर आल्या आहेत. पथनाट्य करतात, असे शो करतात. त्यांच्या वारीचा रुट आहे. क्युआर कोड त्यांनी दिला आहे, जो ब्लॅकलिस्टेड आहे. पंढरपूरच्या वारीचा ही लोकं गैरफायदा घेत आहेत, असे कायंदे म्हणाल्या.
यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली गैरप्रकार सुरू आहेत, असा आरोप करत कायंदे यांनी अंनिसकडे बोट दाखवले. वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. संविधानाच्या नावाखाली फेक नॅरेटिव्ह पसरवणारी ही लोकं तेच तर नाहीत ना, असा सवालही कायंदे यांनी उपस्थित केला.
पक्षबदलूंना महत्त्व देण्याची गरज नाही
यासंदर्भात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अशा लोकांकडे काही लक्ष देऊ नका, हे कधीही पक्ष बदलतात, सोडून द्या, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मनीषा कायंदे यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हटले.